![]()
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा असून राज्यसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणातील संशयित सुनील गाडवे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुनील माने म्हणाले, सुनील गाडवे हा राज्यलोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. २०२३ साली एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. त्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार साहेबांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती, त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून सुनील गाडवे उपस्थित होता. पवारांसोबतच्या फोटोंमागील सत्य त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली होती. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता म्हणून घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाला होता त्यासंदर्भात त्यांनी ही आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी सुनील गाडवे महापौरांचा स्वीय सहाय्यक म्हणून उपस्थित होता. हे फोटो दाखवून नवनाथ बन आमदार रोहित पवार व शरद पवार साहेबांवर आरोप करत आहेत. भाजप नेत्यांशी असलेली जवळीक प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी त्याची अतिशय जवळीक होती. जरी त्यांनी याच्यासोबतचे संबंध नाकारले असले तरी त्यांच्यासोबत जवळीक असलेले अनेक फोटो उपलब्ध आहेत. गाडवे याने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी दिली होती ते फोटो मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले आहेत. त्याचप्रमाणे आमदार अभिमन्यू पवार यांचा व मुख्यमंत्र्यांचा सत्कार करतानाचे फोटो उपलब्ध आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यातही तो उपस्थित होता. गाडवेची पत्नी राज्यसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर त्याने पत्नीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. स्वतःच्याच कार्यकर्त्याला झिडकारले त्याचप्रमाणे महापौर मंजुषा नागपुरे यांचा सहायक म्हणून त्याची निवड कोणी केली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वास्तविक राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात सुनील गाडवे हा आरोपी आहे की नाही याबाबतची अधिकृत माहिती बन यांना नाही. गृहविभाग भाजपकडे असताना त्यांना याबाबतची माहिती नसणे हे दुर्देवी आहे. भाजपचे आमदार, महापौर आणि मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटणारा व्यक्ती रोहित पवारांचा उजवा हात कसा, अशी विचारणा करत नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा असून आपल्याच कार्यकर्त्याला ते झिडकारत असल्याचे मत सुनील माने यांनी व्यक्त केले.
Source link
नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा:MPSC पेपरफुटीतील संशयित सुनील गाडवे भाजपचाच कार्यकर्ता, सुनील मानेंचा खळबळजनक आरोप
