Headlines

मुंबईतील मोकळ्या जागांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा:म्हणाले- मैदाने, प्लेग्राउंड आमदार-बिल्डर मित्रांना देण्याचा पॅटर्न, नेपाळ महापुरावरही व्यक्त केली चिंता




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागा आणि मैदानांच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील मोकळ्या जागा त्यांचे आमदार आणि बिल्डर मित्रांना वाटल्या जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच, नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरावरही त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मैदाने आणि मोकळ्या जागा आमदारांच्या घशात! मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “गेल्या दोन आठवड्यांपासून आपण मुंबईत एक विशिष्ट ‘पॅटर्न’ पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री मुंबईतील सर्व मोकळ्या जागा, खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने त्यांचे आमदार, विधान परिषद सदस्य (MLC) आणि त्यांच्या बिल्डर मित्रांच्या घशात घालत आहेत. मात्र, आम्ही मुंबईच्या मोकळ्या जागा वाचवण्यासाठी लढत आहोत. ही मैदाने आणि मोकळ्या जागा भविष्यातही सर्वांसाठी कायम मोकळ्या आणि विनामूल्य राहतील, याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ.” नेपाळमधील परिस्थिती हृदयद्रावक राज्याच्या प्रश्नांसोबतच आदित्य ठाकरे यांनी नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरावर आणि भूस्खलनावरही भाष्य करत संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “नेपाळमधून महापुराचे जे काही चित्र समोर येत आहे, ते अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहे. या नैसर्गिक आपत्तीत तिथे अडकलेल्या सर्व नागरिकांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तसेच, या संकटातून नेपाळ लवकरच सावरेल आणि तेथील जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येईल, अशी आम्ही आशा करतो. नेपाळमधील पर्यटकांसाठी ‘रेस्क्यू प्लॅन’ – फडणवीस नेपाळमधील महापुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “मानसरोवर यात्रा आणि इतर कारणांसाठी महाराष्ट्रातील काही पर्यटक तिबेट आणि नेपाळमध्ये गेले आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रातून गेलेल्या सुमारे ८० पर्यटकांची माहिती सरकारकडे आली असून, त्यापैकी आतापर्यंत ४ जणांशी संपर्क झाला आहे. नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारसोबत आमची चर्चा सुरू असून, रेस्क्यू ऑपरेशनची पूर्ण तयारी सरकारने ठेवली आहे.” अद्याप अडकलेल्यांचा अचूक आकडा हाती आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नेपाळमध्ये नेमकं काय घडलं? नेपाळच्या रासुवा जिल्ह्यासह तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली. तिबेटच्या बाजूने आलेल्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने भोटे कोशी आणि त्रिशुली नदी परिसरात अक्षरशः हाहाकार माजवला. अनेक पूल, रस्ते, घरे आणि इतर पायाभूत सुविधा वाहून गेल्या. प्राथमिक माहितीनुसार, हिमालयीन भागातील बर्फ, दगड आणि मातीच्या मोठ्या प्रमाणातील घसरणीमुळे अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला. सुरुवातीला या घटनेमागे भूकंप असल्याचा अंदाज व्यक्त झाला होता; मात्र नंतर ग्लेशियरशी संबंधित घसरण हे संभाव्य कारण असल्याचे अहवाल समोर आले. या आपत्तीत मृतांचा आकडा १६०च्या आसपास पोहोचला असून शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत