![]()
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती देताना, राज्यभरात तब्बल 3100 आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या आयोजनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एफडीएची अधिकृत भूमिकाही स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांना गणपतीच्या भंडाऱ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मुंढे यांनी सांगितले की, आपण सर्वांनी एक समजून घेतले पाहिजे की, हे महाप्रसाद, भंडारा किंवा सण-उत्सव, ईद, गणेशोत्सव याबाबत नाही. इट इज अबाऊट रेग्युलेशन्स. हे नियमानुसार होत आहे का याबाबत आहे, असे उत्तर त्यांनी दिले. पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, रेग्युलेशन्समध्ये फूड बिझनेसेसमध्ये प्रत्येकाने रजिस्टर्ड लायसन्स करणे अपेक्षित आहे. जे स्टँडर्ड रेग्युलेशन जे आधीपासूनचे आहेत ते पाळावे, यामध्ये नवे असे काहीच नाही. त्यामुळे जिथे जिथे विनापरवाना, विना स्टँडर्ड, विदाऊट प्रोटोकॉल असेल, तर ते नियमभंग करत आहेत. मग ते फेस्टिव्ह सीजन असो वा नसो, ते महत्त्वाचे नाही. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरने लायसन्स घेतले पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे, स्टँडर्ड रेग्युलेशनने ते पुरवले पाहिजे. ही रुटीन प्रोसेस आहे, फेस्टिव्ह सीजन म्हणून नाही. अन्न क्षेत्रातील 3100 हून अधिक आस्थापनांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने 31 जुलैपर्यंत अन्न क्षेत्रातील 3,100 हून अधिक आस्थापनांची तपासणी केली असून, या कारवाईदरम्यान 165 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत, तर 750 हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परवाने निलंबित झालेल्यांपैकी सुमारे 105 जणांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे अपील केले होते, त्यापैकी 70 आस्थापनांना दिलासा देण्यात आला असून उर्वरित प्रकरणांमध्ये अंतिम आदेश देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती स्वतः तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. पुन्हा तपासणी आणि पडताळणी करण्यात येईल तुकाराम मुंढे म्हणाले, नियमांचे पालन केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पुन्हा तपासणी आणि पडताळणी करण्यात येईल. सुधारणा समाधानकारक आढळून आल्यास निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल. नियमांचे पालन न झाल्यास निलंबन कायम ठेवून पुढील कारवाई केली जाईल. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल तरच परवाना तात्काळ निलंबित, अशी माहिती मुंढे यांनी दिली आहे. नियमांचे पालन केले तर नियामकाची गरजच उरणार नाही पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, कारवाईनंतर अनेक रेस्टॉरंट्सकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचे नूतनीकरण केले जात आहे. काही रेस्टॉरंट्सनी ठराविक कालावधीनंतर स्वतःहून किचन बंद ठेवून स्वच्छता आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहर आणि ग्रामीण भागातून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेत बदल झाला आहे. तेल, खाद्यपदार्थांचे रंग आणि दुधाच्या चवीत बदल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी भविष्यात औपचारिक फीडबॅक यंत्रणा उभारण्याचा FDAचा विचार आहे. ‘व्यावसायिकांनी नियमांचं पालन केले तर नियामकाची गरजच उरणार नाही, असेही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Source link
गणपतीच्या भंडाऱ्यासाठीही अन्न परवाना सक्तीचा!:तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली 'FDA'ची भूमिका; म्हणाले- 'सण असो वा उत्सव, नियमांचे पालन आवश्यकच'
