Headlines

जमीन व्यवहारासाठी जीपीए देणाऱ्या अनगोळच्या महिलेला अटक


करंबळ येथील एक एकर जमिनीचे प्रकरण

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

करंबळ, ता. खानापूर येथील एक एकर जमिनीचे मूळ मालक आपणच असल्याचे सांगत त्या जमीन व्यवहारासाठी जीपीए करून देणाऱ्या अनगोळ येथील एका महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या एक महिन्यापासून अशाच प्रकरणात अनेकांना अटक झाली आहे. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, एच. एल. केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मेहजबीन शिराज मुल्ला (वय 37) राहणार झटपट कॉलनी, अनगोळ या महिलेला अटक करण्यात आली आहे.

18 मार्च 2025 रोजी नावगे येथील लिना अँथोन डिसोजा (वय 50) यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. आपल्या नावाची जमीन विकण्यासाठी भलत्याच महिलेने जीपीए तयार करून दक्षिण उपनोंदणी कार्यालयात याची नोंद केल्याची फिर्याद लिना यांनी दिली होती.

पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता करंबळ येथे लिना यांच्या नावे असलेली एक एकर जमीन विकण्यासाठी त्या जमिनीचे मूळ मालक आपणच असल्याचे सांगत 4 जानेवारी 2025 रोजी उपनोंदणी कार्यालयातील वेब कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून घेऊन अंगठ्याचे ठसे देऊन कृषी जमिनीची विक्री करण्यासाठी जीपीए करून दिल्याची कबुली या महिलेने दिली आहे.

फसवणुकीच्या या प्रकारासाठी मेहजबीनला मदत करणाऱ्या पवन कांबळे व राजू कुडची यांचा तपास करण्यात येत आहे. रविवारी पोलिसांनी मेहजबीनला अटक केली आहे. बेळगाव, खानापूरसह विविध तालुक्यातील जमिनींच्या व्यवहारासाठी बोगस कागदपत्रे तयार करणे, त्या जमिनीशी संबंधित नसलेल्या व्यक्ती आपणच मालक असल्याचे सांगत व्यवहार करण्याचे प्रकार वाढले असून मार्केट पोलिसांनी असे व्यवहार उकरून काढण्यासाठी मोहीमच सुरू ठेवली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत