Shekhar Phadke : मराठी अभिनेते शेखर फडके यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मालिकांमधील कामाबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेते शेखर फडके यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. शेखर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करत आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी कामाबद्दल भाष्य केला आहे. स्पष्टवक्तेपणामुळे माझी खूप कामं गेली, असं शेखर यांनी म्हटलंय.
मुलाखतीदरम्यान शेखर फडके यांना मनासारखं काम मिळालं नाही, असं वाटतं का? असं विचारलं असता शेखर म्हणाले की, ‘याचं कारण मी स्वतः आहे. करोनाच्या अगोदर माझ्यात स्पष्टवक्तेपणा होता. समजा तुम्ही नाटकाचे किंवा मालिकेचे निर्माते असाल आणि मला ती मालिका आवडली नाही, तर मी सांगायचो की, फार वाईट नाटक आहे किंवा वाईट मालिका आहे. त्यामुळे तो माणूस पुढे त्याच्या एखाद्या कामामध्ये मला का घेईल? त्याच्या दृष्टीने तो बरोबर आहे.’
यापूर्वी कधी असं झालंय का? असं विचारलं असता शरद म्हणाले की, ‘खूपदा झालंय, आताही होतं. माझे मित्र निर्माते, दिग्दर्शक आहेत. ते पण मला सांगतात, तू आमच्याशी तेव्हा तसं वागला होतास. चॅनेलमध्ये काही माणसं अशी आहेत की, जी कॉलेजमध्ये स्पर्धांना एकत्र होती. तिथे मी त्यांना मात दिली. पुरस्कारांच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला नाही, मला मिळाला. पुढे ते टेक्निकल टीमकडे वळले, मी अभिनयाकडे वळलो. त्याचा राग त्यांच्या मनात अजूनही आहे. म्हणून, काही चॅनेलला मला काम मिळत नाही. मला काही मालिकांमधून काढलेलं आहे आणि कारण न देता काढलेलं आहे. त्यामध्ये प्रोडक्शनचं काही चुकलेलं नाही, ही दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.’
‘यामध्ये मी राकेश सारंगचं नाव घेऊ शकतो. ‘साहेब बीबी मी’ ही मालिका आलेली. त्याच वाहिनीवर एका कार्यक्रमाचं मी अँकरिंग करत होतो. काही कारणास्तव मी तो शो सोडला. ते कारण मी त्यांना सांगू शकत नव्हतो कारण ते वैयक्तिक होतं. त्यांना असं वाटलं की, चॅनेलनं न काढता याने शो सोडला. त्यानंतर मला असं कळालं की, त्या कारणामुळे मला सगळ्या मालिकांमधून काढत होते. पण, राकेश सारंग यांनी विरोध केला. तेव्हापासून मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. ही माझी माणसं आहेत, हे मी बोलवलेले कलाकार आहेत, मग हे मोठे कलाकार असू देत किंवा नवीन कलाकार असू देत. याला काढणार असाल तर संपूर्ण मालिका बंद करतो, असं राकेश यांनी सांगितलेलं. हे मी इतरांकडून ऐकलंय. मी त्यांच्या तोंडून ऐकलं नाही. पण, राकेश यांचा त्यांच्या प्रोडक्शनवर आणि कलाकारांवर खूप विश्वास आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकतो.’ असं शेखर यांनी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शेखर फडके बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा