Headlines

Khavdya dongar incident shocking allegations by youth mother sangeeta chandgude going viral; माझा संसार उद्ध्वस्त केलास, ७ पिढ्या हे पाप फेडशील; नक्की कोणापासून त्रास? खवड्या डोंगरप्रकरणी आईचा आधीचा व्हिडिओ व्हायरल


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन चांदगुडे कुटुंबाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. मृत कुणालची आई संगीता चांदगुडे यांचे सोशल मीडिया अकाऊंटवरील काही कथित व्हिडिओ समोर आले असून, यामध्ये त्यांनी आपल्या पतीच्या नातेवाइकांवर कौटुंबिक छळ, संपत्ती हडपल्याचा आणि संसार उद्ध्वस्त केल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये संगीता चांदगुडे अत्यंत आक्रमक आणि उद्विग्न मनस्थितीत बोलताना दिसत आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे नातेवाईकांना थेट इशारा देत म्हटले आहे की, “माझं आणि माझ्या मुलाचं वाईट करून झालं असेल ना, तर तुम्ही तुमचं वाईट होताना बघण्याची हिंमत ठेवा! माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलेस. तू सात पिढ्या हे पाप फेडशील, हा एका आईचा शब्द आहे.”

​”जी मेला तरी मयताला येणार नाही म्हणायची, ती प्रिय झाली?”

संगीता चांदगुडे यांनी आपल्या पतीला उद्देशून अत्यंत भावुक आणि संतप्त सवाल केला आहे. व्हिडिओत त्या पुढे म्हणतात, जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभी होती. तुमच्या आजारपणात तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन फेऱ्या मारत होती, तुम्ही ठीक व्हावे म्हणून प्रत्येक देवाकडे प्रार्थना करत होती, तुमच्यासाठी व्रत करत होती. आज तीच बायको वाईट झाली? आणि नातेवाईक तू मेला तरी मी तुझ्या मयताला येणार नाही, असं बोलत होती, ती आज तुम्हाला चांगली वाटायला लागली? यालाच रक्ताचं नातं आणि कलियुग म्हणतात,” असा उल्लेख या व्हिडिओंमध्ये आढळून येत आहे.

​प्रॉपर्टीचा वाद अन् ‘त्या’ ६ वर्षांच्या जुन्या जखमा

व्हिडिओमध्ये संगीता यांनी प्रॉपर्टी (संपत्ती) आणि कौटुंबिक वादांवरून अनेक गंभीर आरोप केले आहेत. १८ वर्षांत कधीही भाच्याला जवळ न करणाऱ्यांनी केवळ पैशासाठी आणि संपत्तीसाठी भावाला (मुरलीधर) स्वतःकडे ओढल्याचे त्यांनी म्हटले आहे. आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार दूर केला आणि आज पैशासाठी भावाचा म्हातारपणाचा सहाराही हिरवून घेतलास. माझ्या मुलाचा हक्क खाऊन म्हातारपणात बदाम खाणार नाहीस, तर मेडिसिनच खाशील; पण तेव्हा रडायला माणूस भेटणार नाही, अशा शब्दांत त्यांनी स्वतःचा संताप व्यक्त केला आहे.

​पोलीस तपासाची दिशा बदलणार?

खवड्या डोंगर परिसरात ही घटना घडल्यानंतर यापूर्वी केवळ आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून आत्महत्या झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता संगीता यांचे हे जुने व्हिडिओ समोर आल्यानंतर या आत्महत्येमागे कौटुंबिक छळ, संपत्तीचा वाद, नातेवाईक हस्तक्षेप आणि मानसिक त्रास मुख्य कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगीता यांच्या नावाने असलेल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील या व्हिडिओंची पुष्टी करून त्याआधारे एमआयडीसी वाळूज पोलीस आता नातेवाईकांची चौकशी करण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ या व्हिडिओंची पुष्टी करत नाही.