Headlines

Pune NSUAI ABVP Clash; Rahul Gandhi Chhatron Ki Gunj Event Tension



काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. 22) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. पुणे पोलिसांनी या क

.

या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस (एनएसयूआय) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या परिसरात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही बाजूंचे समर्थक आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या ठिकाणी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील दाखल झाले आहेत.

ABVP च्या गुंडांनी दोन मुलींना डांबून ठेवले- विजय वडेट्टीवार

माध्यमांना प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, दोन मुलींना कोंडून ठेवले. ABVP च्या गुंडांनी तिला डांबून ठेवले, तिला धमकावले, मारहाण केली. त्या मुलीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या युवा कॉंग्रेसच्या काही मुली इथे आल्या, न्याय मागायला. ज्या दोन अनाथ मुलींना ज्या पद्धतीने हुकुमशाही, दादागिरी करण्याचे काम केले. उद्याच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे तसेच कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचे हे षड्यंत्र असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केला. तसेच जोपर्यंत त्या मुलींना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तसेच ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. यावेळी कॉंग्रेस नेते सतेज पाटील, विश्वजित कदम देखील दाखल झाले असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व नेते धरणे आंदोलनाला बसले आहेत.

ABVP च्या कार्यकर्त्यांनी तरुणांना धमकावल्याचा कॉंग्रेसचा आरोप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) काही कार्यकर्त्यांनी सीओईपी महाविद्यालयाच्या परिसरात जाऊन राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत तरुणांना धमकावल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे; या प्रकारानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडून परिस्थिती अधिकच चिघळल्याचे पाहायला मिळाले.

राहुल गांधीला पळता भुई थोडी करू- ABVP

ABVP चे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, राहुल गांधीच्या तीनपाट कार्यक्रमासाठी प्रेक्षक मिळेना म्हणून विद्यार्थ्यांवर जोर जबरदस्ती केली जात आहे. COEP सारख्या नामांकित परिसरात काँग्रेस आणि NSUI चे 100-150 गुंडांनी घुसून त्याठिकाणी विद्यार्थिनींना मारहाण केली आहे. ज्या मुलांनी अडविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. छात्रो की गुंज चा डंका पिटवणाऱ्या राहुल गांधीला या विद्यार्थ्यांची गुंज ऐकू येत नाहीये का? की बहिरेपणाचे सोंग सुरू आहे? एका सर्वसामान्य अनाथ मुलीने काँग्रेसला एक्सपोज केल्याने यांच्या बुडाला आग लागली आहे. विद्यार्थ्यांवर हात उचलाल तर जशास तसे उत्तर देऊ. काँग्रेस आणि राहुल गांधीला पळता भुई थोडी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- युवक कॉंग्रेस

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे मीडिया विभाग अध्यक्ष अक्षय जैन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आज COEP मध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. दोन विद्यार्थिनींनी त्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाबाबत आपली व्यथा मांडली होती. एखाद्या विद्यार्थ्याला आपला प्रश्न मांडण्यापासून दबाव किंवा भीती वाटत असेल, तर हा केवळ राजकीय मुद्दा नाही, हा विद्यार्थ्यांच्या हक्कांचा प्रश्न आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, विद्यार्थ्यांना कोणत्याही पक्षाच्या राजकारणात ओढायचं नाही. उलट त्यांना निर्भयपणे आपला आवाज मांडता आला पाहिजे. पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करावी. पण उद्या राहुल गांधी पुण्यात हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्या संवादापूर्वी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होण्याऐवजी, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. आम्ही कोणाशी संघर्ष करण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न राहुल गांधींपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा आवाज नक्कीच थांबणार नाही, असे जैन यांनी म्हटले. तसेच पुढे बोलताना अक्षय जैन यांनी सांगितले की, आमचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून, त्याला संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

राहुल गांधी यांचा विद्यार्थिनींशी संवादाचा कार्यक्रम 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊदरम्यान एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. शिक्षण, महिला सुरक्षा, समानता, स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या संधी या विषयांवर संवाद होणार असून, पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला 30 अटींसह परवानगी दिली आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सीओईपीमधील काही विद्यार्थिनींनी माध्यमांशी बोलताना कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत शैक्षणिक शुल्क आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न मांडले होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनींवर माफीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी दबाव आणण्यात आला. विद्यार्थिनींनी त्यास विरोध केल्यानंतर अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना वसतिगृहात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला. याची माहिती मिळताच काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते वसतिगृह परिसरात पोहोचल्याने तणाव निर्माण झाला.

काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, “राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला तरुणाईकडून मिळणारा प्रतिसाद पाहून विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात आहे. विद्यार्थिनींनी आपल्या अडचणी मांडल्यानंतर त्यांना माफी मागण्यास भाग पाडणे चुकीचे आहे,” असे म्हटले.

विद्यार्थिनीने मांडली तिची बाजू

एका व्हिडिओच्या माध्यमातून सीओईपी कॉलेजमधल्या विद्यार्थिनीने नेमके काय घडले होते ते सांगितले आहे. तिने सांगितले की, “माझं नाव संपदा प्रमोद पडे आहे. मी COEP कॉलेजला आहे. मी सेकंड इयर सीएसई (CSE) डिपार्टमेंटला आहे. माझी ऍडमिशन ओबीसी ऑरफन (OBC Orphan) थ्रू झालेली आहे. मी फर्स्ट इयरला 9760 आणि सेकंड इयरला 3760 फीस भरलेली आहे. काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयूआय (NSUI) आणि काँग्रेसची लोकं आले होते. एबीपी माझावर आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की, आमच्याकडून जास्त फीस घेतात. पण ऍक्च्युअलीमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून, तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं. आणि जे खरोखर चुकीचं आहे. ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की, जर मी आता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकतील किंवा पूर्ण फीस भरावे लागतील. जे सर्वस्वी चुकीचं आहे. यासाठी मी कॉलेजची माफी मागते, अशी माहिती या विद्यार्थिनीने दिली आहे.

आयोजकांवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी

हा कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला असून, याला सुमारे आठ ते दहा हजार जण प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. तसेच, या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी ही आयोजकांवरच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मूलभूत सुविधा आणि सुरक्षेच्या अटी

पोलिसांनी आयोजकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या अटी घालून दिल्या आहेत. कार्यक्रमस्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासोबतच, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र रांगा, बाहेर पडण्यासाठी पुरेसे आणि सुरक्षित मार्ग, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, अग्निशामक यंत्रणा आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, खासगी सुरक्षारक्षक आणि महिला सुरक्षेसाठी विशेष महिला स्वयंसेविका तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन

या कार्यक्रमाला होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षेसाठी सुमारे 500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक नियोजनासाठी तब्बल 700 वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे 42 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत