Headlines

Crime News: मुख्याध्यापिकेला संपवलं; ‘बाबू’, पार्ट्या अन् आयफोनमुळे गूढ उकललं, दहावीचे 2 विद्यार्थी अटकेत


मुख्याध्यापिकेचं शव त्यांच्याच घरात आढळून आलं. पोलिसांनी तपास सुरू केला. अखेरचा कॉल मावशीला करण्यात आला होता. त्यात बाबू शब्द वापरण्यात आला होता. याच शब्दानं तपासाला दिशा दिली आणि दोन विद्यार्थी गजाआड गेले.

telangana principle
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हैदराबाद: एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दहावीच्या २ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. आठवडाभरापूर्वी रुपा यांचा खून झाला होता. दोघांपैकी एका विद्यार्थ्याला रुपा यांनी चोरी करताना पकडलं होतं. त्यानंतर त्यानं आपल्या मित्राला हाताशी धरून रुपा यांना संपवलं.

११ ऑगस्टला रुपा यांचं शव घरात सापडलं. त्यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. त्यांच्यावर चाकूनं २७ वार करण्यात आले. रुपा यांनी शेवटचा कॉल त्यांच्या मावशीला केला होता. कॉल कट करण्यापूर्वी मावशी सोबत बोलताना रुपा यांनी ‘बाबू’ शब्दाचा वापर केला होता. याच शब्दाच्या जोरावर पोलिसांनी प्रकरणाची उकल केली.

बाबू शब्दाचा वापर साधारणपणे विद्यार्थ्यांना हाक मारताना केला जातो. त्यामुळे यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची भूमिका असावी, असा संशय पोलिसांना आला. यानंतर पोलिसांनी रुपा यांच्या परिचयाच्या लोकांची चौकशी केली. यामध्ये शाळकरी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

नलगोंडाचे पोलीस अधीक्षक शरत चंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात विद्यार्थ्यांकडे संशयाची सुई होती. दहावीत शिकणारे २ विद्यार्थी अचानक खूप पैसे खर्च करू लागल्याचं, मित्रांसोबत पार्ट्या करू लागल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा संशय वाढला. बुधवारी सकाळी दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं.

दोघांपैकी एका विद्यार्थ्याकडे पोलिसांना १.५१ लाख रुपये, एक आयफोन सापडला. हे पैसे आई, वडिलांनी दिल्याचा दावा त्यानं सुरुवातीला केला. यानंतर पोलिसांनी रोख रक्कमेची फॉरेन्सिक चाचणी केली. तेव्हा पैशांवर मानवी रक्ताचे डाग आढळले. दोन्ही विद्यार्थ्यांना मद्यपानाचं व्यसन आहे. यापैकी एकाला दुचाकी आणि कार चालवण्याचा छंद आहे. त्याला कमी वेळात जास्त पैसा कमवायचा होता.

हत्येच्या १५ दिवस आधी हा विद्यार्थी रुपा यांच्या नजरेत आला होता. मुख्याध्यापिका असलेल्या रुपा आणि शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच्या दप्तरात मोबाईल आणि रोकड पाहिली होती. त्यामुळे रुपा यांनी त्याला हॉस्टेलमधून काढलं. त्याला केवळ सामान्य वर्गात बसण्याच्या सूचना केल्या. त्याच्या आई-वडिलांनादेखील त्याच्या वर्तणुकीची कल्पना देण्यात आली होती.

याच घटनेनंतर विद्यार्थ्यानं रुपा यांच्या घराला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. ११ ऑगस्टला विद्यार्थ्यांकडून शाळेची फी भरली जात होती. त्यामुळे ११ तारखेला रुपा यांच्या घरात बरीच रोकड असेल, असा विचार आरोपी विद्यार्थ्यानं केला. पाच दिवसांपूर्वीच हत्येची योजना आखण्यात आली. त्यासाठी दोघांनी चाकू आणि ग्लव्ह्ज खरेदी केले. परिसराची रेकी करण्यात आली. सीसीटीव्ही नेमके कुठे आहेत, तेदेखील पाहून ठेवण्यात आले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा