Headlines

ताम्हिणी घाटात 10 किमी लांबीचा बोगदा तयार होणार, दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्तता होणार


पुणे आणि रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात 10 किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. हा बोगदा तयार झाल्यास पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे येणाऱ्या अडथळांपासून काहीशी सुटका होईल, तसेच प्रवासाचा वेळ देखील वाचणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

Tamhini Ghat
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : पावसाळ्यात अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे महिनाभर वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागलेल्या ताम्हिणी घाटातील धोकादायक मार्गाला पर्याय म्हणून 10 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद अमित नाईक उपस्थित होते.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा रायगड जिल्ह्यातील घाट मार्गांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते बाधित झाले. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील राष्ट्रीय महामार्गावरही दरडी कोसळल्याने वाहतूक जवळपास महिनाभर ठप्प होती. याचा परिणाम स्थानिक नागरिकांसह रायगडच्या पर्यटन व्यवसायावरही झाला.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

ताम्हिणी घाटातील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन धोकादायक भाग वगळून दहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. बोगदा झाल्यास पावसाळ्यातील वाहतुकीतील अडथळे कमी होण्याबरोबरच प्रवासाचा वेळही वाचणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Sunil Tatkare

ताम्हिणी घाट महिनाभर बंद ठेवल्याने स्थानिकांचे नुकसान

दरम्यान, मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात वेगवेगळ्या ठिकाणी दरळ कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे ताम्हिणी घाटचा रस्ता जवळपास महिनाभर बंद राहिला. यामुळे ताम्हिणी घाटातील पर्यटन पूर्णपणे बंद झाले. त्याचा फटका स्थानिक व्यवसायिकांना बसला आणि त्याचा परिणाम रोजगारावरही झाला. ताम्हिणी घाटातील पर्यटनावर शेकडो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे या मार्गावर काही पर्याय उपलब्ध झाल्यास छोटे व्यवसायिकांना दिलासा मिळू शकतो.

चार रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी होणार

दरम्यान, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेल अंतर्गत कर्जत येथे तीन आणि नागोठणे येथे एक अशा चार रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, ही कामे लवकरच सुरू होतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका सुरु होणार

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड येथील पथकर नाक्याला स्थगिती मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. या मार्गिकेचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा