शहर वार्ताहर/कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे ते हिर्लोक हा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून गुरुवारपासून या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी आलेले काँक्रिट-खडी मटेरियल हे योग्य पद्धतीची वापरण्यात येत नसल्याचा आरोप करीत वेताळ बांबर्डेवासियांनी काम बंद पाडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी जाब विचारत धारेवर धरले.
वेताळ बांबर्डे ते हिर्लोक मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आज सकाळपासून सा. बां. विभागाच्यावतीने सुरुवात करण्यात आली. या कामासाठी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे खड्डे बुजविताना योग्य प्रमाणात मटेरियल वापरत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या मार्गावरील खड्डे बुजविताना ग्रीटचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रूपेश पवार यांनी घटनास्थळी भेट घेत देत खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली. हे खड्डे बुजविताना योग्य पद्धतीचे मटेरियल वापरण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मात्र, रस्त्याच्या कामाबाबत निष्काळजीपणा झाल्यास आणि पुन्हा या मार्गावरील खड्डे पुन्हा जैसे थे झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
