Mumbai municipal corporation to spend 702 crores for 1 km underground pedestrian path congress expresses opposition; मुंबई महापालिका सव्वा किलोमीटरसाठी तब्बल ७०२ कोटी खर्च करणार
Mumbai municipal corporation to spend 702 crores for 1 km underground pedestrian path congress expresses opposition; मुंबई महापालिका सव्वा किलोमीटरसाठी तब्बल ७०२ कोटी खर्च करणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्र्ल पार्क तयार केल्यानंतर मुंबईकरांसह पर्यटकांना तिथे सहजपणे पोहोचता यावे आणि त्यानंतर सायन्स सेंटर मेट्रो स्थानक, सागरी किनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत त्यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एमएमआरसीएल) १.३ किलोमीटरचा भूमिगत पादचारी मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘एमएमआरसीएल’ करणार असून, मुंबई महापालिका ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार रुपये खर्च करणार आहे.
प्रस्ताव उद्या, बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. या १.३ किमी मार्गासाठी ७०२ कोटी रुपयांच्या खर्चभारामुळे काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिका आधीच २ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबवत आहे. त्यातच महापालिकेवर चालू आर्थिक वर्षात सुमारे आठ हजार कोटींच्या देयकांची जबाबदारी आहे. त्यामुळे या पादचारी भुयारी मार्गाच्या खर्चाचा भार महापालिकेने का उचलावा, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.
महालक्ष्मी रेसकोर्समार्गे ॲक्वालाइनच्या सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरी किनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यासाठी तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात २८ जुलै २०२५ रोजी बैठक झाली होती. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव, मुंबई विकास रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि ‘एमएमआरसीएल’चे अधिकारी, ‘एमएमआरसीएल’च्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि विद्यमान महापालिका आयुक्त अश्विनी भिडे याही उपस्थित होत्या. या भुयारी पादचारी मार्गाच्या नियोजनाबाबत चर्चा करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यावेळी झाला होता. या बांधकामाचा निधी मुंबई महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याचे ठरले. तर, या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘एमएमआरसीएल’मार्फत करून नगरविकास विभाग, मुंबई महापालिका आणि ‘एमएमआरसीएल’ यांच्यात सामंजस्य करार करून संस्थांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
काँग्रेसने मात्र महापालिकेकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या निधीला विरोध केला आहे. महापालिका आधीपासूनच स्वतःच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देत आहे. या सर्व विद्यमान आर्थिक बांधिलकींचा स्वतंत्रपणे विचार करूनच महापालिकडे आणखी ७०२ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी निधी देण्याची जबाबदारी देणे हे योग्य नसून, याचे मूल्यांकन होणे गरजेचे असल्याचे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी सांगितले.
आणखी भूमिगत पादचारी मार्गांचे प्रस्ताव
गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबई महापालिका मुख्यालयात ‘एमएमआरसीएल’सोबत झालेल्या बैठकीत काही भूमिगत पादचारी मार्गांविषयी चर्चा करण्यात आली होती. मेट्रोला भूमिगत पादचारी मार्ग कसे जोडता येतील, त्यासाठी लागणारा चटई क्षेत्र निर्देशांक यासह अन्य मुद्यांवर यावेळी मंथन करण्यात आले होते. त्यानंतर मेट्रो ३ जेव्हीएलआर ते कफ परेडची तीन स्थानके मुंबईतील बड्या व्यावसायिक आणि निवासी संकुलांना भुयारी पादचारी मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्याला प्रथम मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. मंजुरीनंतर तो ‘एमएमआरसीएल’कडे पाठवण्यात आला. मेट्रो-३ मधील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी आणि अंधेरी एमआयडीसी अशा प्रकारे जोडण्यावर शिक्कामोर्तब करताना विविध कॉम्प्लेक्स जोडण्याच्या आठ प्रस्तावांना मंजुरीही त्यावेळी देण्यात आली. यामध्ये वरळीतील चार, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तीन आणि अंधेरी एमआयडीसीत एका पादचारी भुयारी मार्गाची जोड मेट्रो-३ला देण्यात येणार आहे. ‘एमएमआरसीएल’कडूनच हे काम केले जाणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा