राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये महाराष्ट्राच्या विदित-दिव्याचा डंका, एकूण 17 खेळाडूंना अर्जुन, खेलरत्नचा मानकरी नाही; जीवनगौरव, द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला?
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये महाराष्ट्राच्या विदित-दिव्याचा डंका, एकूण 17 खेळाडूंना अर्जुन, खेलरत्नचा मानकरी नाही; जीवनगौरव, द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला?
National Sports Awards News :अर्जुन पुरस्कार २०२५ च्या यादीत महाराष्ट्राच्या दोन बुद्धिबळपटूंचा समावेश आहे. याशिवाय द्रोणाचार्य आणि जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून असलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची ( National Sports Awards 2025 ) आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने या पुरस्कारांची यादी जाहीर केली असून, देशासाठी उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा यात गौरव करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे यंदा प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन पुरस्कारा’साठी १७ खेळाडूंची निवड झाली असून, यात महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी आपला डंका वाजवला आहे. दरम्यान, यावेळी एकाही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.
महाराष्ट्राच्या शिलेदारांना ‘अर्जुन’ पुरस्कार
बुद्धिबळामध्ये जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करत देशाचे नाव रोशन करणारे महाराष्ट्राचे ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी आणि महिला बुद्धिबळपटू दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
याशिवाय, ॲथलेटिक्समध्ये तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही आणि प्रियांका गोस्वामी यांनी बाजी मारली आहे. बॅडमिंटनमध्ये ट्रीसा जॉली आणि दिग्गज प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या गायत्री गोपीचंद हिलाही हा बहुमान मिळाला आहे. बॉक्सिंगमध्ये नरेंद्र, डेफ शूटिंगमध्ये धनुष श्रीकांत, तर हॉकीमध्ये लालरेमसियामी आणि राजकुमार पाल यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. कबड्डीमध्ये सुरजीत आणि पूजा, पॅरा-शूटिंगमध्ये रुद्रांश खंडेलवाल, पॅरा-ॲथलेटिक्समध्ये एकता भयान, रोइंगमध्ये अरविंद सिंग आणि नेमबाजीत अखिल श्योराण या गुणवान खेळाडूंना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळणार आहे.
फुटबॉलपटू आय. अरुमैनायगम यांना जीवनगौरव
क्रीडा क्षेत्रात प्रदीर्घ काळ भरीव योगदान देणाऱ्या खेळाडूंसाठी दिला जाणारा ‘जीवनगौरव अर्जुन पुरस्कार‘ (Lifetime Arjuna Award) यंदा दिग्गज फुटबॉलपटू आय. अरुमैनायगम यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या सक्रिय कारकिर्दीतील शानदार कामगिरी आणि निवृत्तीनंतरही फुटबॉलच्या विकासासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाचा हा मोठा सन्मान आहे.
‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने कोणाचा सन्मान?
खेळाडूंच्या यशात पडद्यामागे राहून मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’ने ( Dronacharya Award ) सन्मानित केले जाणार आहे. नियमित श्रेणीत ॲथलेटिक्सचे परवीर सिंग, बॉक्सिंगचे छोटे लाल यादव आणि नेमबाजीतील प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांची निवड झाली आहे. तर, जीवनगौरव (लाईफटाईम) श्रेणीमध्ये बॉक्सिंगचे धर्मेंद्र सिंग यादव आणि कुस्तीचे वीरेंद्र कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा