लंडन : भारतीय वंशाचे 28 वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट अर्शदीप सिंह डांग यांनी ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्स (RAF) मध्ये फायटर पायलट म्हणून पात्रता मिळवत इतिहास रचला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर RAF च्या फायटर स्क्वॉड्रनमधून ‘विंग्स’ मिळवणारे ते पहिले शीख पायलट ठरले आहेत.
उत्तर वेल्समधील RAF व्हॅली येथे 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात अर्शदीप यांना अधिकृतपणे ‘विंग्स’ प्रदान करण्यात आले. RAF च्या माहितीनुसार, यूके मिलिटरी फ्लाइंग ट्रेनिंग सिस्टिमअंतर्गत No. 4 फ्लाइंग ट्रेनिंग स्कूलमध्ये टेक्सन विमानावर प्रशिक्षण पूर्ण करणारे ते पहिले शीख प्रशिक्षार्थी आहेत.
चंदीगड ते RAF पर्यंतचा प्रवास
अर्शदीप सिंह डांग यांचा जन्म 1998 मध्ये चंदीगड येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षी ते कुटुंबासह ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील जगदीप सिंह डांग हे लुधियाना येथील असून आई गगनदीप कौर या अमृतसरच्या आहेत. सध्या त्यांचे कुटुंब इंग्लंडमधील साउथॉल येथे राहते.
अर्शदीप यांनी ब्रिस्टल विद्यापीठातून गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर 2022 मध्ये अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले आणि 2023 मध्ये प्राथमिक उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडले.
सायप्रसमधील नियुक्तीनंतर 2024 मध्ये त्यांची फास्ट जेट प्रशिक्षणासाठी निवड झाली. मार्च 2025 मध्ये त्यांनी प्रगत प्रशिक्षण सुरू केले आणि त्याच वर्षी जुलैमध्ये बेसिक फास्ट जेट ट्रेनिंग पूर्ण केले. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांना टेक्सास येथे स्वतंत्र प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आणि जुलै 2026 मध्ये त्यांनी अंतिम ‘विंग्स टेस्ट’ यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
आजोबांचे स्वप्न नातवाने पूर्ण केले
अर्शदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आजोबा सरदार संतोक सिंह डांग यांची इच्छा होती की त्यांचा मुलगा म्हणजेच अर्शदीप यांचे वडील पायलट व्हावेत. मात्र, वडील लहान असतानाच आजोबांचे निधन झाले आणि ते स्वप्न अपूर्ण राहिले.
“माझ्या आजोबांचे स्वप्न होते की माझे वडील पायलट बनावेत. पण परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिले आणि मीही पायलट होण्याचे स्वप्न पाहू लागलो. अखेर ते पूर्ण झाले,” असे अर्शदीप यांनी सांगितले.
‘मी पहिला आहे, पण शेवटचा नसावा’
या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना अर्शदीप म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याचा मला अभिमान आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही कामगिरी करणारा मी पहिला शीख आहे, पण शेवटचा नसावा अशी माझी इच्छा आहे.”
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना आणि शीख संस्कारांना दिले. “माझी आई माझी सर्वात मोठी ताकद आहे. घरात आम्ही आजही पंजाबी भाषा बोलतो आणि नियमित गुरुद्वारात जातो,” असेही त्यांनी सांगितले.
भारतीय वंशाच्या वैमानिकांची गौरवशाली परंपरा
अर्शदीप सिंह डांग यांचे यश हे ब्रिटिश लष्करी विमानचालनातील भारतीय वंशाच्या वैमानिकांच्या समृद्ध परंपरेचा भाग मानले जात आहे. पहिल्या महायुद्धातील वैमानिक इंद्र लाल रॉय तसेच शीख वैमानिक हार्दित सिंह मलिक आणि स्क्वॉड्रन लीडर मोहिंदर सिंह पुज्जी यांच्यानंतर अर्शदीप यांनी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
RAF मध्ये फायटर पायलट म्हणून पात्रता मिळवल्यानंतर अर्शदीप आता आणखी एका वर्षाचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण करणार असून त्यानंतर त्यांची नियुक्ती आघाडीच्या लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनमध्ये होण्याची शक्यता आहे.
