पणजीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात घोषणा
त. भा. प्रतिनिधी
पणजी : गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे आगामी सहा महिन्यात 6 हजार ते 8 हजार नोकऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ती भरती पारदर्शक पद्धतीने व गुणवत्तेनुसार होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्dयात जाहीर केले. पणजीत जुन्या सचिवालयासमोर झालेल्या सदर कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर गोमंतकीय जनतेला उद्देशून भाषण करताना ते बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की, नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गोव्यात रस्ते, बायपास, पूल यांचे जाळे विस्तारत असून त्याचा फायदा प्रवासीवर्गाला होत आहे. पर्वरीचा उ•ाणपूल गणेशचतुर्थीपूर्वी सुरु होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
आनंदी निर्देशांक वाढविण्यावर भर
जनतेचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ (आनंदी निर्देशांक) राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचा दावा करुन डॉ. सावंत म्हणाले की, गोव्याची प्रगती केवळ हा साधन – सुविधा आणि आर्थिक उन्नती यावरच ठरवू नये तर जनतेचे जीवन सुखी, समाधानी होणे तसेच त्यांचे राहणीमान सुधारणे यालाही महत्त्व आहे. त्यांचे कल्याण आणि आनंदी निर्देशांक वाढला पाहिजे. त्यावरच भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
विकसित भारतासाठी योगदान द्या
स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले म्हणून आपण व आपला देश स्वतंत्र झाला याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे सांगून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. कार्यक्रमास मंत्री, आमदार, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबे, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
