Rohit Sharma Fan Sunil : रोहित शर्माला भेटण्याच्या इच्छेने ओडिशातील सुनीलने सायकलवरून तब्बल १८०० किमीचा प्रवास केला. ८ हजारांची सायकल घेऊन सुरू केलेल्या या प्रवासात त्याने अनेक अडचणींचा सामना केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘ हिटमॅन ‘ रोहित शर्माचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याच्याप्रती असलेल्या चाहत्यांच्या प्रेमाची आणि वेडेपणाची अनेक उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. आता अशीच एक अनोखी आणि प्रेरणादायी घटना समोर आली आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी ओडिशातील एका चाहत्याने चक्क १८०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत मुंबई (ठाणे) गाठली आहे.
कोण आहे हा चाहता?
सुनील असे या अवलिया चाहत्याचे नाव असून तो ओडिशातील अंगुल जिल्ह्याचा रहिवासी आहे. १० वी पास असलेला सुनील क्रेन ऑपरेटर म्हणून काम करतो, तर त्याचे वडील शेतकरी आहेत. आगामी विश्वचषकासाठी रोहित शर्माला भेटून त्याला प्रत्यक्ष शुभेच्छा द्यायच्या, एवढीच सुनीलची एकमेव इच्छा होती आणि याच इच्छेपोटी त्याने हा कठीण प्रवास निवडला.
स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून प्रवास
सुनीलचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याने आपल्या कष्टाच्या कमाईतून थोडे-थोडे पैसे साठवून ८००० रुपये जमा केले आणि त्यातून एक सायकल विकत घेतली. साधारण १५ दिवसांपूर्वी त्याने ओडिशावरून मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला होता. वाटेत जे काही मिळेल ते खाऊन त्याने आपला प्रवास सुरू ठेवला. सुनीलने सांगितले की, प्रवासादरम्यान अनेक लोकांनी त्याला २०० ते ५०० रुपये देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वाभिमान जपत कोणाकडूनही पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला.
सुनीलचा हा १८०० किलोमीटरचा सायकल प्रवास अनेक संकटांनी भरलेला होता. सततच्या पावसात सायकल चालवल्यामुळे त्याच्या पायांना दुखापत झाली आहे. तसेच वाटेत लागणाऱ्या निर्मनुष्य आणि निर्जन जंगलांमधून प्रवास करताना त्याला अनेकदा भीतीही वाटली. परंतु, रोहितशर्माला भेटण्याच्या त्याच्या ध्येयापुढे या सर्व अडचणी आणि वेदना फिक्या पडल्या.
आणि भेटीची प्रतीक्षा संपली!
तमाम संकटांवर मात करत मुंबईत पोहोचलेल्या सुनीलला आता फक्त आणि फक्त आपल्या ‘हिटमॅन’च्या भेटीची प्रतीक्षा होती. रोहितनेही त्याला भेट दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या या जिद्दीने, मेहनतीने आणि निखळ प्रेमाने पुन्हा एकदा हेच सिद्ध केले आहे की, क्रिकेटच्या महानायकांप्रती भारतीय चाहत्यांच्या भावना किती खोल आणि अथांग असतात.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा