Vinod Kambli Biopic : क्रिकेटच्या मैदानावरून अभिनय क्षेत्रापर्यंतचा विनोद कांबळींचा प्रवास आता वेब सीरिजमधून समोर येणार आहे. त्यांच्या आयुष्यातील कोणते किस्से पडद्यावर दिसणार, याची उत्सुकता वाढली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटमध्ये काही खेळाडूंच्या कारकिर्दीची चर्चा त्यांच्या विक्रमांपेक्षा त्यांच्या जीवन प्रवासामुळे अधिक होते. विनोद कांबळी हे त्यापैकीच एक नाव. क्रिकेटच्या मैदानावर दमदार सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला वेगळीच वळणं मिळाली. आता हाच प्रवास रुपेरी पडद्यावर नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. विनोद कांबळी यांच्या आयुष्यावर आधारित या वेब सीरिजचं नाव ‘कांबळी’ असणार आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे या प्रोजेक्टवर २०१९ पासून काम करत असल्याची माहिती आहे. ही वेब सीरिज ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, त्यांनी यूट्यूब चॅनेलवर या सीरिजचे पोस्टरही प्रदर्शित केले आहे.
सचिनसोबतची ऐतिहासिक भागीदारीही दिसणार?
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची मैत्री क्रिकेटविश्वात कायम चर्चेत राहिली आहे. १९८८ मध्ये हॅरिस शिल्ड स्पर्धेत दोघांनी मिळून ६६४ धावांची विक्रमी नाबाद भागीदारी केली होती. रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा प्रवासही सीरिजमध्ये पाहायला मिळू शकतो. कांबळींच्या क्रिकेट कारकिर्दीतील यशाबरोबरच त्यानंतर आलेल्या अडचणी आणि आयुष्यातील चढ-उतारांवरही या सीरिजमध्ये प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे.
१९९६ च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर कांबळी मैदानावर भावुक झाले होते. त्यावेळी रडतानाचा त्यांचा फोटो क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही कायम आहे. त्यांच्या आयुष्यातील हा भावनिक प्रसंगही सीरिजमध्ये पाहायला मिळू शकतो.
सचिनसोबतच्या नात्यातील दुरावाही चर्चेत
कांबळी आणि सचिनच्या मैत्रीतील चढ-उतारांचाही या वेब सीरिजमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. सचिनच्या निवृत्तीच्या वेळी केलेल्या भाषणात आपलं नाव न घेतल्याने कांबळी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दोघांच्या नात्यात काही काळ दुरावा निर्माण झाल्याची चर्चा झाली होती.
विनोद कांबळी यांनी क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावलं. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनर्थ’ या चित्रपटात त्यांनी अभिनेता संजय दत्तसोबत काम केलं होतं. त्यामुळे क्रिकेटपासून अभिनयापर्यंतचा त्यांचा प्रवासही या वेब सीरिजचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
विनोद कांबळींच्या आयुष्यातील अनेक घटना आणि किस्से आजही चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची ही कहाणी पडद्यावर नेमकी कशी मांडली जाते, कांबळी अन् सचिन यांच्या भूमिका कोण साकारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा