मेष
आत्मविश्वास बाळगा
या आठवड्यात चंद्र, मंगळाची प्रेरणादायक साथ मनास दिलासा देणारी ठरेल. तुमचे व्यवहार चातुर्याने पूर्ण करण्याचा विडा उचला. चंद्र, मंगळाचा शुभयोग मनोबल प्रदान करेल. शुक्र, शनी विरोधकांना कटकारस्थाने करण्याचे बळ देणार आहेत. नोकरदारांनी आत्मविश्वासाने अंगभुत गुणवत्तेचा नियोजनपूर्वक वापर करण्यावर भर द्यावा. व्यावसायिकांनी आर्थिक धोरण चुकणार नाही, याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्यासाठी तडजोडीची तसेच सर्वानुमते निर्णय घेण्याची तयारी ठेवा.
वृषभ
सुसंवाद साधा
या आठवड्यात नोकरीधंद्यातील जबाबदारीस न्याय देण्यात अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मंगळाची नकारात्मक भूमिका अनाकल्पित समस्यांचा अनुभव देणार आहे. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता टिकवण्याचा प्रयत्न करा. भागीदारांची मर्जी सुसंवादाने संपादन करण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्यांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. विरोधकांच्या कटकारस्थानामुळे कार्यगती मंदावेल. वरिष्ठांच्या मनातील गैरसमजाचे ढग दूर करण्यास उत्तरार्धात यश मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रश्न चर्चेने सुटतील.
मिथुन
माणसांची पारख करा
या आठवड्यातील नव्या संधीची योग्य परीक्षा करण्यावर भर द्या. आर्थिक व्यवहारात संयमाने नियमावलीचा अभ्यास करा. व्यावसायिकांनी माणसांची योग्य पारख करून जवळीक ठेवावी. आर्थिक व्यवहारास अंतिम स्वरूप देताना लेखी स्वरूपात व्यवहार करण्याची दक्षता घ्यावी. नव्या कल्पना प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवा. व्यावसायिकांनी प्रवासाचे नियोजन करताना योग्य सल्ला घ्यावा. उत्तरार्धात मान्यवरांच्या भेटीगाठी कार्यास योग्य दिशा देतील. मुलांच्या प्रगतीसाठी आर्थिक तरतूद करावी लागेल.
कर्क
दूरदृष्टीने निर्णय घ्या
या आठवड्याच्या पूर्वार्धात कार्यक्षेत्रात कलागुणांना नवे व्यासपीठ मिळण्याची शक्यता निर्माण होईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यात निर्णायक यश मिळेल. शुक्र-चंद्र शुभयोगाने आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. व्यावसायिकांना दूरदृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. कार्यक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची जिद्द अनुभवाल. धैयवादाने मनास नवी उर्जा मिळेल. विरोधकांना रोखण्याचे मनोबल प्राप्त होईल. गृहखर्चाचे नियोजन करण्यास प्राधान्य द्यावे.
सिंह
बचतीचा मार्ग निवडा
या आठवड्यात आर्थिक उलाढालीचे स्वीकृत उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळे येणार आहेत. व्यावसायिकांनी भांडवल उभारण्यासाठी राजमार्गाचा स्वीकार करावा. नव्या योजनेत गुंतवणुकीचा मोह टाळा, तसेच बचतीचा मार्ग विचारपूर्वक निवडा. अव्यवहार्य पद्धतीने कर्जवृद्धी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नोकरदारांना आक्रमक कार्यशैलीमुळे विरोधाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने जटिल प्रश्न सोडवा. घरातील ज्येष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी वादाचे मुद्दे प्रकर्षाने टाळावेत.
कन्या
तात्त्विक मतभेद टाळा
या आठवड्यात कार्यक्षेत्रातील विरोधकांवर मात करण्यात वेळ व पैसा यांचा अपअव्य टाळावा. तात्त्विक मतभेदाने कार्यशक्तीचा क्षय होईल. गुरूकृपेने महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवा. व्यावसायिकांना नव्या ओळखीत प्रगतीचे मार्ग खुले होतील. मान्यवरांच्या भेटीगाठी सफल ठरतील. नोकरदारांच्या कामातील छुपे विरोधक उत्तरार्धात सक्रिय होतील. नोकरदारांनी कायदेविषयक नियमावलीच्या लक्ष्मणरेषेचा योग्य सन्मान करावा. आप्तस्वकीयांचा विश्वास संपादन करण्यावर भर द्यावा.
तुळ
स्नेह जपणे महत्त्वाचे
या आठवड्याच्या प्रारंभी आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. चंद्राची प्रतिकूलता नोकरीधंद्यातील स्नेहसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता दाखवत आहे. कार्यक्षेत्रातील वरिष्ठांच्या योजनांचा सखोल अभ्यास करा. मनाची चंचलता नियंत्रित करण्यास प्राधान्य द्यावे. प्रसंगानुरूप धोरणात बदल करण्याची मानसिक तयारी ठेवा. उत्तरार्धात भांडवल उभारण्याच्या प्रयत्नास ज्येष्ठांच्या सल्ल्याने यश मिळेल. गृहकर्तव्यास प्राधान्य दिल्याने मनास समाधान लाभेल. मित्रपरिवाराची प्रेरणादायक साथ लाभेल.
वृश्चिक
विरोधकांचे डावपेच ओळखा
या आठवड्याच्या प्रारंभी कार्यदिशा निश्चित केल्याचे शुभ परिणाम दिसतील. मनाची एकाग्रता व अचूक निर्णयक्षमता याचा योग्य समन्वय साधणे हिताचे ठरेल. शुक्र-चंद्राची प्रेरक साथ लाभवर्धक ठरेल. मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन योजनांचे सादरीकरण करण्यात सफलता मिळेल. विरोधकांचे डावपेच ओळखा व योग्य रणनीती आखण्यास प्राधान्य द्या. नोकरदारांनी संयम व शिस्त याचे अनुकरण करावे. ज्येष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करा.
धनु
बुद्धिचातुर्याचा कस लागेल
या आठवड्याच्या प्रारंभी नोकरीधंद्यातील जबाबदारीस न्याय देण्यात दिरंगाई करू नका. स्वीकृत योजना मार्गी लावण्यातील अडथळे दूर करण्याचे कौशल्य सिद्ध करणे हे आव्हान ठरेल. नोकरदारांच्या बुद्धिचातुर्याचा कस लागणार आहे. कार्यक्षेत्रातील बदलत्या स्थितीनुसार स्वतःची गुणवत्ता विकसित करण्यावर भर द्यावा. वृश्चिकेतील चंद्रभ्रमणाने वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. आहारविहाराबाबत विशेष दक्ष राहा. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवण्याबाबत कठोर भूमिका घ्या.
मकर
कार्यतत्पर रहा
या आठवड्याच्या प्रारंभी नोकरीधंद्यातील वरिष्ठांच्या मनातील गैरसमजाचे वादळ शमवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा. मंगळ व गुरू यांची साथ मनोबल प्रदान करेल. सत्याची पाठराखण करण्याची आपली भूमिका स्तुत्य असली तरी सत्त्वपरीक्षेस सामोरे जाण्यास तयार राहावे. नोकरदारांनी गुणवत्ता व कार्यतत्परता सिद्ध करण्यास प्राधान्य द्यावे. उत्तरार्धात आर्थिक व्यवहारात लाभाचे योग येतील. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याचे प्रश्न पुन्हा डोके वर काढतील. गृहकर्तव्यास प्राधान्य द्यावे.
कुंभ
सावध तो समाधानी
या आठवड्याच्या प्रारंभी ग्रहरचनेने प्रतिकूलतेचे संकेत देऊन सावध केले आहे. कार्यक्षेत्रातील दबावगटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक व्यवहारातील खाचखळग्यांचा योग्य अंदाज घ्या. आर्थिक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, आर्थिक क्षमतेचा विचार करून गुंतवणूक करा. शनी, मंगळ, रवी यांच्या नकारात्मक भूमिकेने मान्यवरांची साथ लाभणे दुरापास्त होईल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तरार्धात अहोरात्र मेहनत करावी लागेल. जोडीदाराच्या अपेक्षांचे ओझे वाढणार आहे.
मीन
शब्द पाळा
या आठवड्याच्या प्रारंभी भागीदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरेल. देण्याघेण्याच्या व्यवहारातील छुप्या अटींचा सखोल अभ्यास करा. नव्या योजना मार्गी लावण्याचे नवे डावपेच आखावे लागतील. विरोधकांच्या कुटिल कारवायांचा अंदाज घेण्यात दिरंगाई करू नका. नव्या संकल्पना राबवण्यापूर्वी आर्थिक व्यवस्थापनास महत्त्व द्या. नोकरदारांनी नियमावलीचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. दिलेला शब्द पाळण्यासाठी अथक प्रयत्न करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी मन अस्वस्थ करतील.

