Headlines

Sukhbir Singh Badal Attacked: सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – sukhbir singh badal attacked near gurdwara in maharashtra nanded


Sukhbir Singh Badal Attacked: स्थानिक गुप्तचर यंत्रणा, गर्दीचे व्यवस्थापन, कार्यक्रमपूर्व धोक्याचे विश्लेषण आणि नांदेड प्रमाणे ‘अनपेक्षित धोक्या’चा स्वतंत्र अंदाज या सर्वांचा समन्वय यापुढे आवश्यक आहे.

sukhbir singh badal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
नांदेड येथील श्री माता साहिब गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या कृपाणहल्ल्याकडे गांभीर्याने बघायला हवे. या घटनेकडे, महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेसमोरील गंभीर प्रश्न या दृष्टिकोनातून पाहायला हवे. त्यांच्यावरील हा दुसरा हल्ला.

माजी मुख्यमंत्री असलेले बादल यांच्यासारख्या ‘झेड-प्लस’ सुरक्षा असलेल्या नेत्याच्या इतक्या जवळ दोन वेळा हल्लेखोर पोहोचतातच कसे, हा मुद्दा सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करतो. बादल यांच्यावर डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरातही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सुरक्षा कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे गोळीचे लक्ष्य चुकले आणि बादल बचावले. आता अवघ्या वीस महिन्यांत त्यांच्यावर पुन्हा हल्ला होणे ही चिंताजनक बाब आहे. पंजाबच्या राजकारणाचा इतिहास भावनिक संघर्षांनी भरलेला आहे. त्यामुळे राजकीय मतभेदांना हिंसेचे रूप मिळणे थांबवणे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे.

गुरुद्वारा असो वा सार्वजनिक व्यासपीठ – हिंसेला कोणत्याही परिस्थितीत स्थान नसावे. नांदेडच्या घटनेतील हल्लेखोर मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे निष्पन्न झाले तरी एका मूलभूत प्रश्नातून सुटका नाही. तो असा की, अशी व्यक्ती संवेदनशील ठिकाणी, तेही झेड-प्लस सुरक्षा असलेल्या नेत्याच्या इतक्या जवळ पोहोचलीच कशी? हल्लेखोर दोन वर्षांपासून याच गुरुद्वारात सेवक म्हणून राहत होता. यातून राज्य सरकारसह सर्वच यंत्रणांनी घ्यावा असा धडा हा, की मान्यवरांची- नेत्यांची सुरक्षा फक्त बंदूकधारी अंगरक्षकांच्या संख्येवर ठरवता येणार नाही.

केवळ चित्त थाऱ्यावर असलेल्या हल्लेखोरांना रोखण्याबरोबरच अनपेक्षित, अज्ञात धोका ओळखणे हेच चोख सुरक्षा यंत्रणेचे खरे कसब असते. झेड-प्लस सुरक्षा असलेल्या नेत्याच्या जवळ धार्मिक स्थळाच्या परिसरात हल्लेखोर पोहोचतो, हे जर ‘मनोरुग्णाचा वेडेपणा’ म्हणून फाईलबंद करण्याइतके साधे असेल, तर मग झेड-प्लस सुरक्षेला अर्थच काय उरतो? आज बादल होते; उद्या कोणताही लोकप्रतिनिधी किंवा नागरिकही असू शकतो. पवित्र स्थळ असो वा राजकीय व्यासपीठ, कायद्याच्या राज्यात हिंसेला प्रवेशबंदीच हवी नि सुरक्षाही चोख हवी.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा