![]()
पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून 15 लाख रुपये घेतल्याप्रकरणी शिवानंद बाळासाहेब पाटील (रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर, कमिन्स कॉलेजजवळ, पुणे) याच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याच्यावर दाखल झालेला हा आर्थिक फसवणुकीचा चौथा गुन्हा असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पाटील याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर, भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी निलेश हनुमंत शिंदे (वय 35, रा. गणेशनगर, पुणे) यांनी पर्वती पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, शिवानंद पाटील याने आपण पुणे महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच मंत्रालयात आपली चांगली ओळख असल्याचा दावा करून पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता किंवा उपआयुक्त या पदांवर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून शिंदे यांनी डिसेंबर 2023 पासून पुढील कालावधीत पाटील याला रोख स्वरूपात 15 लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर पाटील याने पुणे महानगरपालिकेच्या सहीचे बनावट नियुक्तीपत्र, बनावट बदली आदेश आणि बनावट ओळखपत्र दिले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा गुन्हा सिंहगड रस्त्यावरील वेद हॉटेल, पुणे येथे आर्थिक व्यवहारात घडला आहे. पर्वती पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करीत आहेत.
Source link
शिवानंद पाटीलवर फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल:पुणे मनपात नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक
