एकूण 28 सदस्यांची निवड : सत्ताधारी गटात दिसली चुरस, आता अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
बेळगाव महानगरपालिकेच्या 24 व्या कार्यकाळासाठी चार स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पद्धतीने करण्यात आली. सत्ताधारी व विरोधी गटातील एकूण 28 सदस्यांची निवड करण्यात आली. प्रादेशिक आयुक्त व महापालिकेच्या निवडणूक प्रभारी के. एम. जानकी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : 23 व्या स्थायी समिती सदस्यांची मुदत मागील महिन्यात संपली. त्यानंतर प्रादेशिक आयुक्तांनी नव्या स्थायी समिती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. त्यानुसार बुधवारी सकाळी 28 पदांसाठी 28 नगरसेवकांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध म्हणून जाहीर करण्यात आली.
स्थायी समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करताना महापौर प्रीती कामकर म्हणाल्या, आपल्या नगरसेवकांच्या सहकार्याने कोणताही गोंधळ न होता निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्व सदस्यांच्या एकजुटीने विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. उपमहापौर हनुमंत कोंगाली म्हणाले, विकासकामांच्या गुणवत्तेच्या आधारावर महापालिकेला 16 व्या आर्थिक योजनेत 34 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. कर्नाटकातील सात महानगरपालिकांपैकी विकास कामांची दखल घेऊन आमच्या महानगरपालिकेची स्मार्ट सिटी- 2 साठी निवड झाली असून विकासासाठी प्रत्येक प्रभागाला 1 कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. येत्या काळात आणखी नवीन प्रकल्प शहरात राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नगरसेवकांसह अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
निवड झालेले सदस्य
?कर स्थायी समिती
ब्रह्मानंद मिरजकर, रमेश मैलागोळ, निपाणी टोपगी, शंकर पाटील, रविराज सांबरेकर, मोमीनसाब मतवाले, बसवराज मोदगेकर.
?आरोग्य व शिक्षण स्थायी समिती
राजू भातकांडे, प्रिया सातगौडा, रूपा चिक्कलदिनी, श्रीशैल कांबळे, नेत्रावती भागवत, शाहीदखान पठाण, शहा मोमीन पठाण.
?बांधकाम स्थायी समिती
श्रेयस नाकाडी, सविता पाटील, गिरीश धोंगडी, अभिजीत जवळकर, जयंत जाधव, लक्ष्मी लोकरी, खुर्शिद मुल्ला.
?लेखा स्थायी समिती
सारिका पाटील, रेश्मा कामकर, माधवी राघोचे, जयतीर्थ सौंदत्ती, नितीन जाधव, शिवाजी मंडोळकर, अफरोज मुल्ला.
