![]()
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू असून, आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक नियमितपणे होत असून, या बैठकीत व्हेरिफिकेशन, व्हॅलिडिटी तसेच सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संबंधित कामकाजाची माहिती घेतली जात आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रक्रियेला अधिक वेग देण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची कार्यवाहीही सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. दरम्यान, सातारा गॅझेट तसेच औंध संस्थान गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून स्वतंत्र अभ्यास सुरू आहे. या दोन्ही गॅझेटच्या अनुषंगाने उपलब्ध कागदपत्रे, कायदेशीर बाबी आणि प्रशासकीय प्रक्रियेचा विचार केला जात आहे. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत साताऱ्यातून आग्रह वाढत असताना, यासंदर्भात मंत्री व राजघराण्याचे प्रतिनिधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. आंदोलनापूर्वी सरकारकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती जरांगे-पाटील यांना लेखी स्वरूपात देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Source link
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती:आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकारचा पाठपुरावा; मंत्री शंभूराज देसाईंची माहिती
