![]()
अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सर्व खातेप्रमुख पंचायत राज समितीसमोर (पीआरसी) साक्ष देण्यासाठी मुंबईत गेले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, केवळ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. सन २०१६ चा लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल आणि २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात तत्कालीन पंचायत राज समितीने अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली होती. त्यावेळी समितीने काही त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. या त्रुटींवर आधारित अहवाल तयार करून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली जाणार होती. या प्रकरणी पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी डॉ. पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सीईओ सत्यम गांधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डीआरडीएच्या संचालक प्रीती देशमुख, कॅफो आणि इतर अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईत बोलावले होते. डॉ. पुलकुंडवार यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) साक्ष दिली. यापूर्वी पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी चार वेळा वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या, परंतु प्रत्येक वेळी बैठक रद्द झाली. तीन महिन्यांपूर्वी, त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी आणि अलीकडे ३ व ४ ऑगस्ट रोजीही बैठका ठरल्या होत्या, पण त्या होऊ शकल्या नाहीत. अखेर ११ ऑगस्ट रोजी साक्ष निश्चित झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पुलकुंडवार यांनी सोमवारीच अधिकाऱ्यांकडून आवश्यक तपशील घेतले. त्यामुळे संबंधित सर्व अधिकारी बुधवारपासून (१२ ऑगस्ट) अमरावतीकडे परतण्यास सुरुवात करतील. त्यांच्या परतल्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज पूर्ववत सुरू होईल.
Source link
जिल्हा परिषद अधिकारी मुंबईत:पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी पोहोचले, कामकाज प्रभावित
