Headlines

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे:खासदार बजरंग सोनवणे यांची PM मोदींकडे मागणी, कोणकोणत्या मागण्या केल्या? वाचा सविस्तर




राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विकासाचे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. या भेटीनंतर, बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मागण्यांवर चर्चा झाली आणि पंतप्रधानांसमोर कोणते विषय मांडण्यात आले, याबाबतची सविस्तर माहिती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी मराठवाड्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, पावसाळ्याचे अडीच महीने उलटूनही पाऊस न पडल्याने नद्या कोरड्या ठाकल्या आहेत. गोदावरीचा अपवाद वगळता एकाही नदीला पाणी आलेले नाही. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या संकटसमयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. 2025-26 चा पीक विमा तातडीने द्यावा तसेच सन 2025-26 चा पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याच्या गंभीर प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही ठोस मदत न मिळाल्यामुळे बळीराज्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, संतप्त शेतकरी आता रस्त्यावर उतरत आहेत. ही परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन, थकीत पीक विमा आणि नुकसानभरपाईची रक्कम त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या मागण्या कोणत्या? – प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सन 2025–26 मधील प्रलंबत दाव्यांचे त्वरित पैसे अदा करावेत आणि 2026–27 पासून अ‍ॅड-ऑन कव्हर पुन्हा लागू करावे.
– ऊसतोड कामगरांच्या मुलांसाठी हंगामी/फिरत्या शाळा तसेच स्थानिक रोजगाराची व्यवस्था करावी.
– कृषी आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया, MSME आणि कौशल्य विकासाला चालना देऊन रोजगाराच्या संधी वाढवाव्यात.
– धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाला गती द्यावी आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.
– बीडमध्ये मेडिकल कॉलेज व सुपर स्पेशालटी आरोग्य सुविधा तसेच अंबाजोगाईत 50 खाटांचे क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर करावे.
– एफपीओ, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस आणि कृषी प्रक्रिया सुविधांचा विस्तार करावा.
– बीडमधील धार्मिक व पर्यटनस्थळांचा केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास करावा. आम्ही 100 टक्के विरोधी पक्षातच राहणार दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर देखील बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्ही 100 टक्के विरोधी पक्षातच राहणार आहोत, असे स्पष्ट केले. तसेच विमानात सत्ताधारी नेत्यांशी भेटीगाठीवरून विनाकारण संशय व्यक्त केला जात आहे. प्रवासादरम्यान योगायोगाने भेटी होणे स्वाभाविक आहे. यापूर्वीही विरोधी पक्षाचे नेते लोकहितार्थ सत्ताधाऱ्यांना भेटत होते. परंतु, अशा भेटींचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही, असे सोनवणे यांनी म्हटले आहे. संसदेचे कामकाज ठप्प होण्यास सत्ताधारीच जबाबदार संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे ही प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते, मात्र ते विरोधकांशी कोणताही संवाद साधत नसल्याने सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे, असा घणाघात बजरंग सोनवणे यांनी केला. सरकारला विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून तोडगा काढणे आवश्यक असताना, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच ही परिस्थिती ओढवली असून याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, यापुढील काळात विरोधी पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडी जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयासोबत आपला पक्ष पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे उभा राहील, अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत