Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case Encroachment Notice to Accused Home : अहिल्यानगरमध्ये सध्या तापलेलं प्रकरण म्हणजे विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण. आता या प्रकरणातील तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस चिपकवल्या आहेत.

अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या
धीरज परदेशीयांच्यावर हल्ला केलेल्या आरोपी असलेल्या मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनानं अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसेच मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे असल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
नोटिशीत नेमकं काय?
नागरदेवळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 52 आणि 53 अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचं ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. बांधकामाची परवानगी असल्यास तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीनं दिला आहे. तसेच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2374 व 2517 संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचं निदर्शनास आल्यानं हे बांधकाम तत्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असंही नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं आहे. संबंधितांना आपलं म्हणणं आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी
धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर न्यायालयानं तिन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून, हल्ल्यामागील नेमकं कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील?
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्यानं प्रशासनानं कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे. आता नोटीस बजावण्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगानं पुढं जातं, याकडं अहिल्यानगरकरांचं लक्ष लागलं आहे.
Nagpur News:पावसाची उसंत आणि मूर्तिकारांना दिलासा ; गणेश मूर्तिंची काम शेवटच्या टप्प्यात
जिथे मारहाण झाली, तिथेच अंत्यविधी करा; पत्नीची मागणी
धीरज परदेशी यांच्या पत्नीनं अत्यंत संतप्त मागणी केली आहे. ‘माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली, त्याच कब्रस्तानात त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढलं असून, प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

