Brett Lee on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे ब्रेट लीने कौतुक केले आहे. वैभवच्या वयापेक्षा त्याची क्षमता महत्त्वाची असल्याचे सांगताना त्याच्याविरुद्ध गोलंदाजी केली असती तर हेल्मेटच्या बॅजला टार्गेट केले असते असे लीने म्हटले आहे.

‘वय किती आहे, याने मला फरक पडत नाही’
वैभवच्या वयावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत ब्रेट लीने स्पष्ट भूमिका मांडली. तो १५ वर्षांचा असो किंवा त्यापेक्षा मोठा, त्याने मैदानावर दाखवलेली क्षमता महत्त्वाची असल्याचे लीने सांगितले. आयपीएलमध्ये वैभवने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना दाखवलेल्या आत्मविश्वासाने आपण प्रभावित झाल्याचेही त्याने म्हटले. विशेषतः वेगवान गोलंदाजी आणि बाऊन्सरविरुद्ध वैभवने खेळलेले हुक आणि पुल शॉट्स त्याला आवडले. बियर बायसेप्स या यूट्यूब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये तो बोलत होता.
Shubman Gill : गिल फिट, यशस्वी हिट! श्रीलंका कसोटीआधी टीम इंडियाला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज
वैभवविरुद्ध ब्रेट लीने काय केले असते?
वैभवविरुद्ध स्वतः गोलंदाजी करण्याची वेळ आली असती, तर त्याने शॉर्ट बॉलचा वापर केला असता. वैभवला पुल आणि हुक शॉट खेळायला आवडतात. त्यामुळे त्याच्या हेल्मेटवरील बॅजला लक्ष्य करत वेगवान चेंडू टाकला असता, असे ब्रेट लीने सांगितले. विशेष म्हणजे वैभवने त्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारला असता, तरी पुढचा चेंडूही त्याच पद्धतीने टाकण्यास आपण मागेपुढे पाहिले नसते, असे लीने स्पष्ट केले. त्यामुळे वैभवच्या आक्रमक फलंदाजीला त्याच आक्रमकतेने उत्तर देण्याचा त्याचा प्लॅन असता.
आत्मविश्वासाने ब्रेट ली प्रभावित
वैभवची फलंदाजी पाहताना त्याचा आत्मविश्वास आणि मानसिकता सर्वाधिक लक्ष वेधून घेते, असे ब्रेट लीने म्हटले. गोलंदाज कोणताही असो किंवा चेंडू कसा असेल, वैभव त्याचा सामना न घाबरता करताना दिसतो. हीच त्याची मोठी ताकद असल्याचे लीचे मत आहे.
वैभवने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ४० सामने खेळताना १,६७० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि आठ अर्धशतके आहेत. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल २१७ इतका आहे.
‘आत्ताच त्याच्यावर दबाव टाकू नका’
असे असतानाच, वैभववर आत्तापासूनच मोठा दबाव टाकण्याची गरज नाही, असेही ब्रेट लीने म्हटले आहे. त्याला नैसर्गिक खेळ करू द्यावा आणि योग्य पद्धतीने त्याची कारकीर्द घडवावी, असा सल्ला त्याने दिला.
वैभवमध्ये मोठा खेळाडू बनण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याच्या वयापेक्षा त्याचा खेळ, गुणवत्ता आणि आत्मविश्वास याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे ब्रेट लीच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

