काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधले ‘ग्रेटेस्ट ऑलराऊंडर’ (खरंतर बऱ्याच जणांच्या मते ‘ग्रेटेस्ट क्रिकेटर’) गारफिल्ड सोबर्स यांचं निधन झालं. सगळ्या देशांतले क्रिकेटर्स, त्यांना खेळताना पाहिलेले प्रेक्षक, त्यांच्याविषयी ऐकलेले क्रिकेटप्रेमी फार हळहळले. शोधाशोध करून मी माझ्याकडे असलेली सोबर्स यांची (जुन्या डायरीतली) सही बघत बसलो होतो. ही स्वाक्षरी मला डेबूकाकांनी मिळवून दिली होती. या निमित्ताने डेबूकाकांची खूप आठवण आली. फक्त सोबर्सची नाही, त्यांच्याबरोबर हंट, रोहन कन्हाय, लान्स गिब्स या वेस्ट इंडिजच्या स्टार क्रिकेटर्सच्याही सह्या होत्या. डेबूकाकांनीच मिळवून दिल्या होत्या. दुसऱ्या डायरीत नवाब ऑफ पतौडी, एकनाथ सोलकर, प्रसन्ना, दिलीप सरदेसाई आणि सुनील गावस्कर यांच्या सह्या. याही डेबूकाकांमुळेच. केवळ आमच्यासाठी त्यांनी या क्रिकेटर्सचा पिच्छा पुरवला. काही क्रिकेटर्स त्यांच्यावर ज्याम वैतागले, पण तरी सह्या दिल्याच.
लहान असल्यापासून आम्ही डेबूकाकांना ओळखत होतो. आम्हाला ते कर्तबगार वाटायचे कारण मोठमोठ्या स्टार क्रिकेटर्सशी त्यांचा संपर्क होता. ते प्रकाशातल्या सगळ्या खेळाडूंना ओळखायचे. त्यांना वेळप्रसंगी मदतही करायचे. म्हणजे क्रिकेटर्सभोवती सह्यांसाठी गर्दी झाली तर पुढे होऊन स्वाक्षरी मागणाऱ्यांना रांगेत उभे करायचे, झुंबड झाली तर आपण होऊन नियंत्रण करायचे, फोटोग्राफर्सना सूचना द्यायचे. (मग हळूच स्वतः फोटोत यायचे!)
त्यांना आम्ही डेबूकाका म्हणायचो. खरं नाव देवेंद्र म्हणे. ते आमच्या कॉलनीमधल्या प्रद्युम्न सुगवेच्या बाबांकडे आले होते. प्रद्युम्न म्हणाला, त्याच्या बाबांचे ते असिस्टंट होते ऑफिसात. आमचा त्यावेळी कॉलनीच्या प्रशस्त आवारात क्रिकेटचा खेळ रंगात आला होता. टेनिस बॉलचंच क्रिकेट, पण आव टेस्ट मॅच खेळत असल्याचा. आमच्यातलाच एकजण टेस्ट मॅचची असते तशी कॉमेंट्री करत होता. डेबूकाका आमचा तो खेळ बघत उभे होते. प्रद्युम्नने ओळख करून दिली. ‘हे डेबूकाका. बाबांच्या ऑफिसमध्ये आहेत. आणि हा आमचा अजित वाडेकर, हा एकनाथ सोलकर, हा लिंडवॉल, तो रिची बेनॉ. म्हणजे, असं ते स्वतःला समजतात. क्रिकेट स्टार्स असल्यासारखे वागतात.’ आम्ही सगळे हसलो. टिंगल हवीच असायची! डेबूकाकाही हसले. ‘क्रिकेटवेडे दिसताय. मीही आहे.’ मग त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला भेटायचंय क्रिकेटर्सना? माझ्या ओळखी आहेत.’ आमच्या आनंदाला पारावार उरला नाही! आणि आम्हाला ते खरंच घेऊन गेले. भारत-वेस्ट इंडिज टेस्ट मॅच सुरू होती. आमच्या कॉलनीतल्या प्रज्ञा केळेकरचे वडील ‘बॉम्बे जिमखान्या’चे सेक्रेटरी असल्यामुळे त्यांना पासेस मिळत. प्रज्ञा ‘व्हीआयपी’ स्टँडमध्ये बसू शकत असे. आम्हा मुलांचा – आम जनतेसाठी होता तो स्टेडियममधला ‘ईस्ट स्टँड’. पण यावेळी आम्हा सात-आठ मुलांना घेऊन डेबूकाका पब्लिकला मनाई असलेल्या व्हीआयपी लाऊंजमध्ये घुसले. त्यांना अडवणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या तिथल्या स्टाफला, सिक्युरिटीला त्यांनी दाद दिली नाही. छातीवरचा सोनेरी वर्खाचा बॅज दाखवला. (ही त्यांची नेहमीची ‘आयडिया’ होती हे आम्हाला नंतर कळत गेलं.) आम्हा मुलांना ग्रेटेस्ट ऑलराऊंडर सोबर्स, रोहन कन्हाय आणि दांडगा, धिप्पाड फास्ट बॉलर वेस्ली हॉल यांच्याबद्दल ज्याम कुतूहल आणि प्रेम होतं. आम्ही वेंधळ्यासारखे इकडे-तिकडे बघत होतो. डेबूकाकांनी ‘गिव देम ऑटोग्राफ प्लीज’ असं एकेकाला सांगून आम्हाला सही द्यायला लावली. चार-पाच वेस्ट इंडियन स्टार्स, शिवाय आपले नरी कॉन्ट्रॅक्टर आणि बापू नाडकर्णी डेबूकाकांच्या तावडीत सापडले.
डेबूकाका सगळ्या प्रसिद्ध खेळाडूंच्या – विशेषतः क्रिकेटर्सच्या फार जवळचे असावेत असं आम्हाला वाटायचं. त्यामुळे आम्हा मुलांना खेळाडूंसारखा डेबूकाकांचाही आदर वाटायचा. त्यांचं नेमकं स्थान कधीच कळलं नाही तरी. त्यांची क्रीडापटूंशी ते दाखवत असलेली सलगी पाहून आम्हा मुलांवर त्यांची चांगलीच छाप पडे. सगळे स्टार्स आपल्याला ओळखतात, काही तर मित्र मानतात, विश्वासात घेतात, बऱ्याच ‘आतल्या’ गोष्टी आपल्याला माहीत आहेत असं ते आम्हा मुलांना सांगत.
ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये कोणाची सेंच्युरी झाली की प्रेक्षकांतून एकजण हार घेऊन पिचकडे धावायचा. त्याच्यामागे मग दोन-तीन पोलिस धावायचे. तो हुलकावणी देत बॅट्समनपर्यंत पोचायचा. कधी तो (किरकोळ) हार बॅट्समनला घातलाही जायचा. तिथे पोचलेले पोलिस त्याला लाठी मारून हुसकावायचे. पुन्हा तो पुढे, पोलिस मागे. डेबूकाकांना क्रिकेटचं आणि क्रिकेटर्सचं जबर वेड असूनही त्यांनी असले ‘सवंग’ प्रकार कधी केले नाहीत. ते काय करायचे, थेट पॅव्हेलियनमध्येच घुसायचे. एकदा बिशनसिंग बेदीने लागोपाठ तीन विकेट्स घेतल्या म्हणून त्याचं अभिनंदन करायला तो (लंचटाइम झाल्यावर) पॅव्हेलियनमध्ये आल्याबरोबर डेबूकाकांनी पुढे होऊन त्याला उचलायचा प्रयत्न केला. बेदीचा एक पाय अधांतरी आणि एक तिरका जमिनीवर काही काळ राहिला. डेबूकाकाच (वजन सहन न होऊन) खाली पडले. वर त्यांना बेदीच्या पंजाबी शिव्याही ऐकाव्या लागल्या. आम्हाला हे प्रज्ञा केळेकरने सांगितलं. पुढे काही होण्याअगोदरच डेबूकाका तिथून सटकले होते म्हणे.
एकदा ते असेच त्यांच्या मित्रांच्या मुला-मुलींना ‘क्रिकेटर्सची भेट घडवून आणतो’ म्हणून रणजी ट्रॉफी मॅचच्या वेळी घेऊन गेले. मॅचनंतर फोटो सेशन चालू असताना डेबूकाका नेहमीच्या सवयीप्रमाणे मधे घुसून मागे उभे राहिले. आपण कॅमेऱ्यात येतो आहोत ना हे वाकून बघत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पुढे बसलेल्या एका उच्च पदस्थाच्या मांडीवर धडपडले. बरीच गडबड झाली. उच्च स्वरात आगपाखड, चौकशी वगैरे सुरू झालं. ‘हा कोण माणूस आहे?’ असं विचारलं गेलं. कोणालाच माहीत नव्हतं. त्यांना अक्षरशः कॉलरला धरून बाहेर काढलं गेलं. त्यांच्याबरोबर आलेली मुलं-मुली रडवेली झाली.
का कुणास ठाऊक, पण आमचा त्यानंतर मग टेस्ट मॅचेस बघायला जाण्याचा उत्साह कमी होत गेला.
ऑस्ट्रेलियाच्या केरी पॅकरने १९७७ की ७८ साली ‘डे अँड नाईट’ सामने आणि झगमगाटी क्रिकेट सुरू केलं. ५० ओव्हर्सचं ‘वन डे’ क्रिकेट! वीस ओव्हर्सचं ‘टी२०’ क्रिकेट २००३ला आलं आणि आयपीएल २००८ साली! या बदललेल्या रंगरूपाच्या क्रिकेटशी जुळवून घेताना डेबूकाकांना त्रास पडला. आधीच्या टेस्ट क्रिकेटच्या सफेद कपड्यातल्या, लाल चेंडूच्या आणि पाच दिवसांच्या ‘प्रतिष्ठित’ सामन्यांच्या तुलनेत झगमगाटी आणि बटबटीत वाटायचं. त्यांच्या आता (रंगीत कपड्यातल्या) नव्या क्रिकेटर्सशी फारशा ओळखीही नव्हत्या. त्यांना आता या वयात पूर्वी तरुण वयात करायचे तशी क्रिकेटर्सच्या भोवती धावपळही करता येत नाही, हे आणखी एक कारण असावं.
… आम्ही मोठे झालो आणि आपापल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगांसाठी वेगवेगळ्या दिशांना पांगलो. त्यामुळे डेबूकाकांचा संपर्क कमी कमी होत जवळजवळ संपलाच.
एकदा आमच्या ग्रुपमधल्या सुदेशला डेबूकाकांची सद्यस्थिती कळली. ते खूप आजारी आहेत, ब्रेन सर्जरी झाली आणि पैशांची फार गरज आहे असं कळलं. हे त्याने आम्हा सगळ्यांना कळवलं. आम्ही त्यांना मदत करायची ठरवलं. खर्च खूपच मोठा होता. आम्ही मदत जमवली, पण एकूण गरज आमच्या आवाक्याबाहेरची होती. कोणीतरी सुचवलं, “ज्यांच्यासाठी डेबूकाकांनी इतकी वर्षं जीव टाकला त्या क्रिकेटर्सना, क्रीडापटूंना विचारायचं का?” ‘प्रयत्न तर करू.’ प्रज्ञा केळेकरच्या प्रयत्नांनी काही क्रिकेटर्स, बॅडमिंटन प्लेअर्स, ॲथलिट्सना त्यांचा फोटो दाखवला. बऱ्याच जणांनी ओळखलं म्हणे. सारखे मुलांना घेऊन येणारे, लुडबूड करणारे, काही ना काही मदतही करणारे. हो हे यायचे खरे.
आश्चर्य म्हणजे, आम्हाला शंका होती पण बऱ्याच क्रिकेटर्सनी, स्पोर्ट्स स्टार्सनी मदत केली. दोन क्रिकेटर्स आणि एका बॅडमिंटन हिरोने तर नावं न सांगण्याच्या अटीवर! शिवाय कार्डांवर शुभेच्छा लिहून दिल्या.
आम्ही सगळे डेबूकाकांना भेटायला गेलो. पण त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. एकाचीही सही, नाव, फोटो ते ओळखू शकले नाहीत. वर्षभरात ते गेले.
… ९० वर्षीय सोबर्सच्या निधनाची बातमी वाचली आणि डेबूकाका आठवले. आमच्या मनातलं त्यांचं स्थान सोबर्सएवढंच मोठं होतं. आमची क्रीडाप्रकारातली छोटी स्वप्नं ते हरप्रयत्ने पुरी करत. अगदी निरपेक्षपणे.
त्यांच्यामुळे मिळालेल्या सह्या आहेत, फोटो आहेत. डेबूकाकांचा मात्र एकही फोटो नाही. सही तर नाहीच.

