आचरा प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणूनच आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपल्या पूर्वजांनी मोठ्या त्यागातून मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पिरावाडीचे सुपुत्र वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच फडकत ठेवूया,” असे गौरवोद्गार आचरा पोलीस निरीक्षक संजय कातिविले यांनी काढले.
क्रांती दिनानिमित्त आचरा-पिरावाडी येथे वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. शाळा आचरा-पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी १९३० साली पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्यासह अकरा स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण यावेळी जागविण्यात आली.
यानंतर वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या पिरावाडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रांतीची मशाल ज्योत प्रज्वलित करून गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीतून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देत देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वातंत्र्याच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला.
यावेळी आचरा पोलीस निरीक्षक संजय कातिविले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम पडवळ, ग्रामोन्नती मंडळ आचरा-पिरावाडीचे अध्यक्ष नारायण कुबल, उपाध्यक्ष मंदार खोबरेकर, सचिव वैभव कुमठेकर, परेश तारी, जय कुबल, ग्रा.पं. सदस्य पूर्वा तारी, पोलीस पाटील तन्वी जोशी, डॉ. प्रमोद कोळंबकर, अनिल करंजे, गिरीधर सारंग, सुरेंद्र कुबल, पिरावाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बुगडे व कर्मचारीवृंद, धनश्री पराडकर, कविता बिर्जे, जि. प. शाळा पिरावाडीचे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, विजय जोशी, नंदू तळवळकर आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची ज्योत आणि राष्ट्रप्रेमाची मशाल पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कुबल यांनी केले.
