महाराष्ट्र टाइम्स•
Nagpur News: महागाईचा वाढता परिणाम हा गणेश चतुर्थीवर चांगलाच दिसून येणार आहे आणि त्याची सुरूवात ही बाप्पांच्या मूर्तींपासुन झालेली आहे. मुर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल महागल्यामुळे त्याचा परिणाम मूर्तींच्या किमंतीवर झालेला आहे .

मूर्तींच्या किमती सरासरी २० टक्क्यांनी वाढ
गणेशोत्सवाला अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच ऐतिहासिक चितारओळीतील अरुंद गल्लीबोळांमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींना अंतिम आकार देण्याचे काम वेगाने सुरू आहे. सार्वजनिक मंडळांच्या भव्य मूर्तींपासून घराघरांत विराजमान होणाऱ्या लहान मातीच्या मूर्तींपर्यंत विविध मूर्ती येथे तयार केल्या जात आहेत. मात्र, कच्चा माल आणि मजुरीच्या खर्चात वाढ झाल्याने यंदा मूर्तींच्या किमती सरासरी २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
महागाईचे सावट मूर्ती व्यवसायावर
भोसलेकालीन तीनशे वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेल्या चितारओळीत पिढ्यानपिढ्या मूर्तिकलेचे काम सुरू आहे. चित्रकाम आणि मूर्तीकाम करणाऱ्या ‘चितारे’ कलाकारांवरून या परिसराला चितारओळी हे नाव पडले. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील स्थितीचा आढावा घेतला असता वाढत्या महागाईचे सावट मूर्ती व्यवसायावर स्पष्टपणे दिसून येते.
वाढ ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
माती, टिन पत्रा, रंग, सजावटीचे साहित्य तसेच मजुरीच्या दरात वाढ झाल्याने मूर्तींचे भाव वाढले आहेत. गेल्या चार पिढ्यांपासून मूर्तिकलेचे काम करणाऱ्या इंगळे कुटुंबातील मूर्तिकार केदार इंगळे म्हणाले, ‘सरासरी २० टक्क्यांनी दर वाढले असून काही विशिष्ट प्रकारच्या मूर्तींच्या बाबतीत ही वाढ ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.’
मूर्ती यंदा अडीच हजार रुपयांपर्यंत गेली आहे
मूर्तिकार सुशील चौरसिया म्हणाले, ‘गेल्या वर्षी दोन हजार रुपयांना मिळणारी एक ते दीड फूट आकाराची मातीची मूर्तीयंदा अडीच हजार रुपयांपर्यंत गेली आहे. तर बारा हजार रुपयांच्या आसपास असणाऱ्या मोठ्या मूर्ती यावेळी चौदा ते पंधरा हजार रुपयांना विकल्या जात आहेत.‘सध्या चितारओळीत मोठ्या मूर्तींचे मातीचे काम पूर्ण झाले असून फिनिशिंग आणि कोरीव काम वेगाने सुरू आहे. मूर्तींच्या रंगकामाला पुढील दोन आठवड्यांत सुरुवात होईल,’ असे मूर्तिकार सचिन गायकवाड यांनी सांगितले.
