Shubman Gill Injury News : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सरावादरम्यान शुभमन गिल दोनदा जखमी झाला. उपचारानंतर तो पुन्हा सरावाला परतला असला तरी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. कोलंबोमध्ये सराव सत्रादरम्यान कर्णधार शुभमन गिल याच्या अंगठ्याला चेंडू लागला. दुखापत होताच त्याला नेट्स सोडून तातडीने वैद्यकीय पथकाकडे जावे लागले. भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेत पोहोचला होता. दुसऱ्या दिवसापासूनच खेळाडूंनी सराव सुरू केला होता. गुरुवारीही (६ ऑगस्ट) संघाने टेस्ट मालिकेपूर्वी जोरदार तयारी केली. यादरम्यान वेगवान गोलंदाजांचा सामना करताना शुभमन गिलच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला.
दुखापत झाल्यानंतर मेडिकल स्टाफने तात्काळ गिलवर उपचार केले. उपचार घेतल्यानंतर भारतीय कर्णधार पुन्हा नेट्समध्ये परतला आणि त्याने फलंदाजी सुरू ठेवली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर स्लिपमध्ये कॅचिंगचा सराव करताना पुन्हा एकदा त्याच्या उजव्या हातावर चेंडू लागला, ज्यामुळे तो वेदनेने विव्हळला. त्यावेळी फिजियोने त्याच्या हातावर आइस पॅक लावला. सध्या ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय संघ शुक्रवारी (७ ऑगस्ट) स्थानिक ‘श्रीलंका इलेव्हन’विरुद्ध तीन दिवसांचा वॉर्म-अप सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन कोणत्याही खेळाडूबद्दल जोखीम पत्करणार भूमिकेत नाही आहे. कारण संघ आधीच दुखापतींच्या अनेक समस्यांशी झुंजत आहे.
बुमराह आणि शिवम दुबे आधीच बाहेर
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आधीच दुखापतीमुळे या टेस्ट मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. तसेच, ऑलराउंडर शिवम दुबेही इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेदरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरू शकलेला नाही, त्यामुळे तो या दौऱ्यासाठी उपलब्ध नाही. हर्षित राणा आधीच बाहेर पडला आहे, त्यामुळे भारतीय संघ नवीन कॉम्बिनेशनसह श्रीलंका दौऱ्यावर मैदानात उतरेल.
शुभमन गिलसाठीही गेल्या काही वर्षांचा काळ दुखापतींमुळे सोपा राहिलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अंगठ्याच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतील काही सामन्यांना मुकावे लागले होते. याशिवाय २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेदरम्यानही घोट्याच्या दुखापतीने त्याला त्रास दिला होता. तर इंग्लंडमधील ३ सामन्यांच्या वन-डे मालिकेत बर्मिंगहॅम येथील सामन्यात तो रिटायर्ड हर्ट झाला होता. तेव्हा तो ८० धावा करून बाहेर गेला होता, मात्र नंतर तो मालिकेतील उर्वरित सामने खेळला होता.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टेस्ट सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवला जाईल. त्यापूर्वी होणारा वॉर्म-अप सामना खेळाडूंना स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची शेवटची संधी असणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन (फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, आकिब नबी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि सारांश जैन.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा