Ind vs SL Test Series : पावसाच्या सरीही थोड्या फार अंतराने येत असल्याने कधी इनडोअर, तर कधी ढगाळ अशा दोन्ही वातावरणात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सराव केला. या सरावात त्यांनी भेदक मारा करणाऱ्या फिरकी गोलंदाजीविरुद्ध आपले तंत्र जास्त घोटवून घेतले.

भारत-श्रीलंकेदरम्यानच्या दोन सामन्यांच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्याआधी भारतीय संघ एक तीनदिवसीय सराव सामना खेळणार आहे. ही दोन सामन्यांची मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेत भारताचे पारडे जड असले, तरी भारतीय खेळाडू कुठलाही धोका पत्करणार नाही. त्यातच गेले काही महिने आणि गतमोसमातील कसोटीतील अपयशी कामगिरीनंतर कानाला खडा लावून भारताच्या कसोटी संघातील फलंदाजांनी पूर्वतयारीत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.
राहुल आणि जयस्वाल यांचा सराव
यासाठी ठोस पूर्वतयारी व्हावी म्हणून या दोन फलंदाजांचा वांद्रे पश्चिम येथील विंग्ज स्पोर्ट्स सेंटर येथे हा सराव सुरू होता. भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे यांची ही अकादमी आहे. अन् येथे या दोन फलंदाजांचा सराव रविवारी आणि सोमवारी रंगला होता. सोमवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते. पावसाच्या सरीही थोड्या फार अंतराने येत होत्या. मात्र, त्यानुसार कधी इनडोअर, तर कधी ढगाळ वातावरण अशा दोन्ही वातावरणात राहुल आणि जयस्वाल यांनी सराव केला. या सरावात राहुल आणि जयस्वाल यांनी फिरकी गोलंदाजीविरुद्ध आपले तंत्र जास्त घोटवून घेतले.
फिरकी माऱ्याचा अधिक सराव
मुंबईचे आघाडीचे फिरकी गोलंदाज या दोन्ही फलंदाजांना मारा करत होते. ज्यात तनुष कोटियनसारख्या अनुभवी, गुणी फिरकी गोलंदाजाचाही समावेश होता. एरवी भारताचे फलंदाज नव्या चेंडूंनिशी सराव करण्यास प्राधान्य देतात. मात्र, श्रीलंकेत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असण्याची शक्यता असल्याने राहुल आणि जयस्वाल यांनीही फिरकी माऱ्यापुढे जास्त सराव करणे पसंत केले. या फिरकी गोलंदाजांमध्ये लेगस्पिनर, डावखुरे फिरकी गोलंदाज आणि ऑफस्पिनरचा समावेश होता. ‘गेले दोन दिवस राहुल आणि जयस्वाल अकादमीत सरावासाठी येत होते. जयस्वाल दोन दिवसांपासून सराव करत होता, तर राहुल सोमवारी येथे आला. त्यांनी एकत्र सरावही केला. श्रीलंकेतील वातावरण आणि त्यांचा फिरकीवरील भर लक्षात घेता राहुल आणि जयस्वाल यांनी नेट सरावात फिरकीला महत्त्व देणे साहजिकच होते,’ असे परांजपे यांनी सांगितले.
तनुष सरावाचा गोलंदाज?
तनुष कोटियन याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, ऐन संघात संधी मिळाली नसली तरी मुंबईचा हा गुणी फिरकी गोलंदाज नेट सरावातील गोलंदाज म्हणून भारतीय संघासह श्रीलंकेला जाणार असल्याचे वृत्त आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजांना आव्हानात्मक फिरकीचा सामना करावा लागू शकतो. त्या दृष्टीने सरावात आपल्या फलंदाजांना सर्वप्रकारच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करायला मिळावा, अशी संघव्यवस्थापनाची धारणा आहे. त्या दृष्टीने निवड समितीने नेट गोलंदाज म्हणून कोटियनसह (ऑफस्पिन), विप्रज निगम (लेगस्पिन), शिवांग कुमार (डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज) आणि हर्ष दुबे (डावखुरा फिरकी गोलंदाज) यांनाही टीम इंडियासह श्रीलंकेला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार आणि सारांश जैन यांचा समावेश आहे.
जाडेजाचे कौतुक
‘आक्रमक दृष्टिकोन ठेवल्याने रवींद्र जाडेजाचा कसोटी क्रिकेटपटू म्हणून मोठा विकास झाला आहे,’ असे मत माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले. सुरुवातीला जाडेजाचा भर कमीत कमी धावा देण्यावर होता. आता मात्र तो विकेटचा विचार करतो आहे, असे पुजाराला वाटते. ‘बळी घेण्यासोबतच त्याने फलंदाजीतही अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले असून, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे,’ असे सांगायलाही पुजारा विसरला नाही.
Auqib Nabi Selection : वेगवान गोलंदाजी नाही तर मग आकिब नबीची खरी ताकद नेमकी काय? इरफान पठाणने दिलं उत्तरजाडेजाने ८९ कसोटींमध्ये २५.१२च्या प्रभावी सरासरीने ३४८ विकेट घेतल्या आहेत. पुजारा म्हणाला, ‘आता त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव झाली असून, तो त्यानुसारच गोलंदाजी करत आहे. प्रत्येक सामन्यात तो चेंडू यष्ट्यांच्या रेषेत टप्पा पाडून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतो.’ पुजाराने जाडेजाचे कौतुक केले असले, तरी निवड समिती त्याच्या पर्यायाचाही विचार करते आहे. त्यामुळे या दौऱ्यात सारांश जैनचा समावेश करण्यात आला आहे.

