सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने गतिरोधक व सूचना फलक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेकडे केली आहे. याबाबत पराग दिपक चव्हाण (रा. माठेवाडा, सावंतवाडी) यांनी नगराध्यक्षा यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक शाळांसमोर वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्याच्या व सुट्टीच्या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळांसमोर तातडीने गतिरोधक, इशारा फलक व आवश्यक ती वाहतूक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच येत्या १५ ऑगस्टपूर्वी ही कामे पूर्ण करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
या मागणीमुळे पालक, शिक्षक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहने चालवण्यात देऊ नये हा कायदेशीर गुन्हा आहे जीवन सुंदर आहे त्यामुळे त्यांना जपा असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे
