काँग्रेसचीही उडी, खेळांना राजकीय प्रयोगांचे माध्यम न बनविण्याचा सल्ला, निर्णयावर फेरविचाराची मागणी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलल्याने निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली असून शनिवारी त्यांनी या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला. खेळ आणि खेळाडूंना संकुचित राजकीय प्रयोगांचे माध्यम बनवू नये, असे म्हणत काँग्रेसने सरकारला या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
’एक्स’वरील एका पोस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे की, हा विषय कोट्यावधी भारतीयांच्या भावनांशी आणि आपल्या क्रीडा परंपरांशी खोलवर जोडलेला आहे. पारंपरिकपणे निळ्या रंगाची जर्सी परिधान करत आलेला भारतीय हॉकी संघ 15 ऑगस्टपासून नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या विश्वचषकादरम्यान केशरी रंगाची जर्सी परिधान करेल. रंगातील या बदलाची घोषणा 27 जुलै रोजी करण्यात आली होती.
भारतीय खेळाडूंची जगभरात ‘मेन इन ब्लू’, ‘द ब्लूज’ आणि ‘द ब्लू टायगर्स’ अशा नावांनी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख केवळ जर्सीच्या रंगापुरती मर्यादित नसून तो भारतीय क्रीडा क्षेत्राचा एक वारसा आहे. या ऐतिहासिक ओळखीमध्ये बदल करण्याची गरज का वाटली हे समजणे आज कठीण आहे. प्रश्न कोणत्याही विशिष्ट रंगाचा नाही, तर निर्णय घेण्याची प्रक्रिया, पारदर्शकता आणि जनभावनेचा आदर यांचा आहे, असे खर्गे यांनी सदर पोस्टमध्ये म्हटले आहे.
या सरकारने व्यापक जनसंमतीशिवाय अनेक ठिकाणी रंग बदलले आहेत. कधी रस्त्यांच्या कडेला पदपथावर, कधी संसद कर्मचाऱ्यांच्या गणवेशात, कधी दूरदर्शनच्या लोगोमध्ये आणि आता खेळाडूंच्या जर्सीमध्ये. राष्ट्रीय चिन्हे, खेळ आणि खेळाडू यांना संकुचित राजकीय प्रयोगांचे माध्यम बनवू नये. सरकारने आणि संबंधित संस्थांनी या निर्णयावर त्वरित पुनर्विचार करावा आणि ‘हॉकी इंडिया’च्या कार्यकारी मंडळाच्या माहितीशिवाय व संमतीशिवाय इतका महत्त्वाचा निर्णय कसा घेतला गेला याचे स्पष्टीकरण द्यावे, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
भारताचे माजी कर्णधार आणि ऑलिंपियन विरेन रास्किन यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेला आहे तसेच देशातील काही बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यातील बहुतांश नवीन रंगाच्या विरोधात आहेत. ‘हॉकी इंडिया’ने यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यात राष्ट्रीय संघाच्या जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात तांत्रिक बाबींचा मुख्यत्वे विचार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मनप्रीतकडून जर्सीचे समर्थन
दरम्यान, भारतीय हॉकीपटू मनप्रीत सिंगने संघाच्या नवीन जर्सीचे समर्थन केले आहे. त्याने सांगितले की, केशरी रंगाची जर्सी वापरण्याचा निर्णय खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाने एकत्रितपणे घेतलेला आहे, तो कोणत्याही बाह्य प्रभावामुळे घेतलेला नाही. निळ्या रंगाचे टर्फ आणि निळे मोजे यांच्याशी रंगांच्या बाबतीत असलेल्या साम्यामुळे होणारी अडचण टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे, असे त्याने स्पष्ट केले. तसेच हा रंग आपल्या राष्ट्रध्वजाचा भाग असल्याने तो संघासाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल, असेही त्याने नमूद केले.
मनप्रीतने म्हटले आहे की, जर आपण मागे वळून पाहिले, तर 2014 च्या विश्वचषकात आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये आम्ही पिवळ्या रंगाच्या जर्सी परिधान केल्या होत्या. तेव्हा तो काही मोठा मुद्दा बनला नव्हता. संघ व्यवस्थापन आणि सर्व खेळाडूंनी मिळून तो निर्णय घेतला आहे. सध्या जो काही राजकीय दृष्टिकोन व्यक्त होत आहे किंवा चर्चा रंगली आहे तो वेगळा विषय आहे, पण हा निर्णय बाहेरून लादलेला नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
