
छत्रपती संभाजीनगर, दि. १ ऑगस्ट : रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व ॲड.अमन आनंदराज आंबेडकर यांनी बदनापूर येथील मोर्चा पूर्ण करून मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी बजाजनगर येथील निवासस्थानी CJP प्रमुख अभिजित दिपके यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल अमन आंबेडकर यांनी अभिजित दिपके यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेल्या आंदोलनामुळे लोकशाही मार्गाने जनआंदोलनाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, ही लोकशाहीसाठी दिलासादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अमन आंबेडकर म्हणाले, “देशभरात पुन्हा एकदा ‘आंबेडकर’ नावाचा जयघोष होत आहे. लोकप्रश्नांशी निगडित आंदोलने समाजात नवे चैतन्य निर्माण करतात. सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करणारा एक नवा आंदोलनकारी चेहरा म्हणून भेट घेतली.”
या भेटीदरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समकालीन प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर अमन आंबेडकर मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी विनोद काळे, काकासाहेब गायकवाड, दिनेश आदमाने, मनीषा साळुंखे आदी उपस्थित होते
