Headlines

'चक्काजाम':नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी 9 ऑगस्टला चक्काजाम आंदोलन : आ.सत्यजित तांबे




नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा लढा आता अधिक तीव्र होणार असून, आगामी ९ ऑगस्ट रोजी (क्रांती दिन) सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्गावरील विविध ठिकाणी एकाच वेळी ‘चक्काजाम’ जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. केंद्र सरकारचे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार तांबे म्हणाले, नाशिक–पुणे सरळ रेल्वे हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा नेत्याचा विषय नसून सामान्य नागरिकांच्या भविष्यासाठीचा लढा आहे. रेल्वेसारखे मोठे प्रकल्प शतकातून एकदाच उभे राहतात, आणि आज जर ही संधी हुकली तर पुढील अनेक पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. सध्या वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अपघातांमुळे दोन-तीन तासांचा प्रवास सहा ते सात तासांपर्यंत लांबत असून विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक व व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सरळ रेल्वे मार्गाची गरज तीव्र बनली आहे. या रेल्वेमार्गामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर आणि चाकण परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, तसेच पुणे व नाशिक शहरांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथे एकाच वेळी हे चक्काजाम आंदोलन होईल. सरकारला जागे करण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे की, जनता एकजूट झाली की सरकारला निर्णय घ्यावाच लागतो, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत