Lung Cancer: आज जागतिक फुप्फुस कर्करोग दिन आहे. हा कर्करोग जनुकीय बदलांमुळे होतो .याविषयी कर्करोगतज्ञ डॉ. मोतर्जा बोहरा यांनी अधिक माहिती दिली. विशेष म्हणजे या जनुकीय कारणांमुळे होणाऱ्या फुप्फुसांच्या कर्करोगावर टार्गेटेड थेरपी अतिशय प्रभावी उपचार पध्दती असल्याचे सिध्द झाले आहे

‘लो डोस सीटी स्कॅन
त्यामुळे जे लोक नियमित धूम्रपान करतात, त्यांनी ‘लो डोस सीटी स्कॅन’(एलडीसीटी) करून घ्यावे. यामुळे या कर्करोगाचे योग्य निदान होऊ शकते. कुणीही धूम्रपान करू नये, हाच या रोगावरील एकमेव प्रभावी उपाय आहे,’ अशी माहिती श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. सुशांत मुळे यांनी दिली.
‘ टार्गेटेड थेरपी ’ ही अतिशय प्रभावी
जनुकीय कारणांमुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगावर ‘टार्गेटेड थेरपी’ ही अतिशय प्रभावी उपचार पद्धती असल्याचे सिद्ध झाले आहे. याच थेरपीमुळे रोगाच्या चौथ्या टप्प्यावर असलेले रुग्णदेखील तीन ते पाच वर्षांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात, हे समोर आले आहे. तर, धूम्रपानामुळे झालेल्या फुप्फुसाच्या कर्करोगावर ‘इम्युनोथेरपी’ प्रभावी ठरत असल्याचा दावा शहरातील तज्ज्ञ मंडळींनी केला आहे.
१ ऑगस्ट हा जागतिक फुप्फुस कर्करोग दिन
दरवर्षी १ ऑगस्ट हा जागतिक फुप्फुस कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी नवीन निदान होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी ७ टक्के कर्करोग हे फुप्फुसांचे असतात. देशात फुप्फुसाचा कर्करोग हा चौथ्या क्रमांकाचा कर्करोग आहे आणि अगदी पहिल्या-दुसऱ्या टप्प्यामध्ये या आजाराचे निदान होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.
निदान होईपर्यंत आजाराचा चौथा टप्पा येतो
त्याचे निदान होईपर्यंत बहुतांश रुग्ण आजाराच्या चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे. मुळात या आजाराची लक्षणे बरीच उशिरा दिसून येतात. लक्षणे दिसू लागेपर्यंत या प्रकारचा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो आणि असेच रुग्ण सर्वाधिक असतात.
‘जेनेटिक म्युटेशन’
यामागे ‘जेनेटिक म्युटेशन’ म्हणजेच जनुकीय बदलही कारणीभूत असल्याचे सांगताना नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे (एनसीआय) कर्करोगतज्ज्ञ डॉ. मोर्तजा बोहरा म्हणाले, ‘सर्वसाधारणपणे ६० टक्के कर्करोग धूम्रपान व इतर घातक वायूंमुळे होतो, तर ४० टक्के कर्करोग जनुकीय बदलांमुळे होतो. महिलांमध्ये तर जनुकीय बदलांमुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.’

