![]()
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात वरिष्ठ पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास संपादन केला आणि मोठी रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शाम विठोबा खतकर (५५, प्रभादेवी), जोगल कुमार लोडया ऊर्फ लोधिया (३९, डोंबिवली पश्चिम) आणि रवींद्र दयानिधी शंकुआ (५२, कल्याण पूर्व) यांना अटक करण्यात आली असून, या टोळीचा आणखी मोठा नेटवर्क असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सराईत टोळीचा पर्दाफाश तपासादरम्यान अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे उघड झाले आहे. मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, हिंगोलीसह विविध जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध शासकीय नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट नियुक्तीपत्रांद्वारे उकळले ७० लाख या प्रकरणातील फिर्यादी दर्शन संतोष पाटील (वय २८, रा. काल्हेर, भिवंडी) यांना महसूल व वन विभागात लिपिक-टंकलेखक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे, बनावट स्वाक्षऱ्या, राजमुद्रांकित नियुक्तीपत्रे आणि बनावट शासकीय ओळखपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी फिर्यादीकडून ऑनलाईन व्यवहार, बँक हस्तांतरण आणि रोख स्वरूपात मिळून तब्बल ७० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. नोकरी न मिळाल्यानंतर फसवणूक उघड दीर्घकाळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने दर्शन पाटील यांना संशय आला. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सर्व नियुक्तीपत्रे आणि कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने तपास सुरू करून तिघांना अटक केली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड जप्त कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मंत्रालयातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट शासकीय लेटरहेड, शिक्के आणि अन्य कागदपत्रे जप्त केली आहेत. या बनावट साहित्याचा वापर करून अनेक नागरिकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यात आले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या टोळीने राज्यातील इतर किती जणांची फसवणूक केली आहे, याचाही सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे नागरिकांना आवाहन सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. कोणीही बनावट नियुक्तीपत्र, शासकीय शिक्के किंवा अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे ही वाचा… विलास घुले हत्या प्रकरण:मराठा नसल्यामुळे न्याय मिळत नाही का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, सुप्रिया सुळेंवरही साधला निशाणा बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार, पोलिस प्रशासन आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मृत विलास घुले यांच्या आई आशाबाई घुले याही उपस्थित होत्या. सविस्तर वाचा…
Source link
मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक:ठाणे गुन्हे शाखेकडून टोळी गजाआड; बनावट शिक्के, लेटरहेड, नियुक्तीपत्रे जप्त
