Headlines

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ची अनोख्या पद्धतीने स्थापना


सावंतवाडी प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा संकल्प घेऊन ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ची आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने सावंतवाडी शहरात स्थापना करण्यात आली. भाजपच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनी या फाउंडेशनची स्थापना केली असून, अध्यक्षपदी नगरसेविका नीलम परिमल नाईक तर सचिवपदी नगरसेविका सुनीता अमित पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे.

पारंपरिक उद्घाटनाऐवजी गोसेवेचा संदेश देत फाउंडेशनचे उद्घाटन गोशाळेत करण्यात आले. गोमातेचे पूजन, गोसेवा आणि समाजसेवेचा संकल्प करून या सामाजिक कार्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी महिला सक्षमीकरण, स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा केली. भारतीय संस्कृती, सेवा, करुणा आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक म्हणून गोशाळेतून कार्याची सुरुवात करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. नीलम परिमल नाईक, उपाध्यक्षपदी सौ. मेघा जयराम राणे, खजिनदारपदी सौ. दुलारी दिलेश रांगणेकर, सहखजिनदारपदी सौ. अंकिता प्रतीक बांदेकर तसेच सचिवपदी सौ. सुनीता अमित पेडणेकर यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी समाजातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर, सक्षम आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि स्वयंरोजगारविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. “गुरूंच्या आशीर्वादाने, गोसेवेच्या साक्षीने आणि समाजसेवेच्या संकल्पाने ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’च्या सामाजिक प्रवासाची आज प्रेरणादायी सुरुवात झाली,” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत