![]()
शाळेची घंटा वाजली, सुटी झाली आणि नेहमीच्या लगबगीने ४० विद्यार्थी किलबिलाट करत बसमध्ये चढले. घरची ओढ लागलेली मुले आपापसात गप्पा मारत होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, धावत्या बसमध्ये अचानक चालकाला भोवळ आली आणि ते स्टेअरिंगवरच बेशुद्ध पडले. क्षणात बस
.
मंगळवारी (२८ जुलै) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील पिरॅमिड चौकात हा थरार रंगला. गुरूकुल ऑलिम्पियाड स्कूलची शाळा दुपारी २.४० वाजता सुटते. नेहमीप्रमाणे ४० विद्यार्थ्यांना घेऊन ही बस त्यांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. ही बस सिडकोतील पिरॅमिड चौकातून टीव्ही सेंटरच्या दिशेने जात असताना, बसचालक विशाल शिवलिंग बागले (३६, रा. दीपनगर) यांना अचानक चक्कर आली. डोळ्यांसमोर अंधारी आल्याने त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.
भरधाव बस रस्त्यावर वेडीवाकडी धावू लागल्याने आत बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. याच वेळी आत असलेल्या केअरटेकर महिलेने धाडस दाखवत थेट ड्रायव्हरच्या केबिनकडे झेप घेतली आणि हँडब्रेक ओढला. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद देऊन बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू
ही बस शाळेच्या मालकीची असून, शाळेने प्रतीक ट्रान्सपोर्ट कंपनीकडे २० ते २५ बसेस चालविण्याचे कंत्राट आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत चालकाच्या घरी जाऊन चौकशी केली. बसची कागदपत्रे आणि चालकाचा परवाना तपासण्यासोबतच, चालकाला पूर्वीपासून काही आजार होता का, याचीही वैद्यकीय विचारपूस करण्यात आली. या प्रकरणी नोंद केली आहे.
‘…अन् मावशींनी ब्रेक ओढल्याने बस थांबली
‘बस वेगात असताना अचानक ती इकडे-तिकडे जाऊ लागली. आम्ही पाहिले तर ड्रायव्हर काका सीटवर बेशुद्ध पडले होते. आम्ही सगळे घाबरून ओरडू लागलो. पण मावशींनी लगेच पुढे जाऊन ब्रेक ओढला आणि बस जोरात हादरून थांबली. अन् आम्ही बसमधून खाली उतरलो. – प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी.
मुले दुसऱ्या बसमध्ये अन् चालक रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे आणि उपनिरीक्षक नाणेकर यांनी मुलांना धीर देत दुसऱ्या बसमध्ये बसवून घरी रवाना केले. तसेच, चालक विशाल बागले यांना खासगी रुग्णालयात दाखल केले मुले सुखरूप असल्याची बातमी मिळताच चिंतातूर पालकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुखरूप पाहून त्यांच्याही जीवात जीव आला.
अर्ध्याहून अधिक बस चढली रस्त्याच्या दुभाजकावर
सिडको ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावर काळा गणपतीसमोर बस डिव्हायडरवर चढली.
