वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कॅनडामध्ये सुरू असलेल्या विश्व स्क्वॅश कनिष्ठांच्या सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने ब्राझील आणि नेदरलँड्स यांचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र महिलांच्या विभागात भारताला मलेशियाकडून हार पत्करावी लागली.
कनिष्ठ पुरूषांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात पाचव्या मानांकीत भारताने गट 5 मध्ये आघाडीचे स्थान मिळविले. भारतीय पुरूष संघाने नेदरलँड्सचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ब्राझीलचे आव्हान 3-0 असे संपुष्टात आणले.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील लढतीत भारताच्या गुरवीर सिंगने नेदरलँड्सच्या बोनेमाचा 11-4, 11-0, 11-2, भारताच्या युशा नफीसने नेदरलँड्सच्या एम्पेनियर्सचा 11-1, 11-4, 11-2, आर्यवीर दिवाणने नेदरलँड्सच्या व्हॅन एस.चा 11-4, 11-3, 11-5 असा पराभव केला.
दुसऱ्या एका लढतीत भारताने ब्राझीलचे आव्हान 3-0 असे संपुष्टात आणले. भारताच्या पूरव रंभीयाने ब्राझीलच्या गुमारेसचा 11-6 11-5, 11-3, युशा नफीसने ब्राझीलच्या प्रेबेटीचा 11-3, 11-2, 11-9, आर्यवीर दिवाणने ब्राझीलच्या हेन्ड्रीक्सचा 11-7, 11-0, 11-0 असा पराभव केला.
महिलांकडून निराशा
महिलांच्या विभागात मात्र भारतीय संघाला मलेशियाकडून निसटता पराभवाला सामोरे जावे लागले. या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताच्या अनहात सिंगने मलेशियाच्या विल्सनचा 11-2, 11-4, 11-5 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मलेशियाच्या हर्लिन तेनने भारताच्या अनिका दुबेचा 11-5, 11-4, 11-6 तसेच मलेशियाच्या लीने अनिकावर 8-11, 11-8, 11-8, 12-10, 11-9 अशी मात केली. भारतीय महिला संघाने सलामीच्या लढतीमध्ये चीन तैपेईचे आव्हान 3-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पुढील सामना द. आफ्रिकेबरोबर तर भारतीय पुरूष संघाचा पुढील सामना कुवेतबरोबर होणार आहे.
