Headlines

मैदान गाजवूनही श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात स्थान नाही; 4 खेळाडूंच्या पदरी निराशा, एकाला तर पदार्पणानंतरच वगळलं


IND vs SL Series : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून सारांश जैनला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. मात्र, दमदार कामगिरीनंतरही चार खेळाडू संघाबाहेर आहेत.

ind vs sl test series 4 players ignored sarfaraz khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीलंकेविरुद्ध होणारी आगामी कसोटी मालिका भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर अनेक अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सारांश जैनला पहिल्यांदाच भारतीय संघाचे बोलावणे मिळाले. मात्र, प्रत्येक निवडीप्रमाणे यावेळीही काही खेळाडूंच्या पदरी मोठी निराशाच आली आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि ‘इंडिया ए’च्या सामन्यांमध्ये घाम गाळूनही ४ स्टार खेळाडूंना श्रीलंका मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही.

सरफराज खानची पुन्हा एकदा निराशा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सरफराज खानचे नाव या यादीत सर्वात वर आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ६० पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा करणाऱ्या या मधल्या फळीतील फलंदाजाकडे पुन्हा एकदा निवड समितीने दुर्लक्ष केले आहे. गेल्या काही काळात सरफराजने आपल्या फिटनेसवरही खूप काम केले आहे आणि टी२० क्रिकेटमध्येही फलंदाजीत मोठी सुधारणा केली आहे. श्रीलंकेच्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर स्पिनर्सचा सामना करण्याची त्याची क्षमता पाहता, तो या दौऱ्यासाठी उत्तम पर्याय ठरला असता. पण, त्याला पुन्हा एकदा संधीची वाट पाहावी लागणार आहे.

Maharashtra TimesIND vs ZIM Series : झिम्बाब्वेत भारताने मालिका जिंकली, पण मैदानाबाहेर फॅनची अजब मागणी! कोच लक्ष्मण, ईशान किशन का संकोचले?

६० विकेट्स घेऊनही आकिब नबीला संधी नाही

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीची कहाणीही तितकीच निराशाजनक आहे. एकाच देशांतर्गत हंगामात तब्बल ६० विकेट्स घेणे ही कोणत्याही बॉलरसाठी खूप मोठी कामगिरी असते. मात्र, एवढ्या दमदार कामगिरीनंतरही आकिब नबीला निवड समितीने संघात घेतले नाही. आपल्या धारदार गोलंदाजीने छाप पाडणाऱ्या आकिबला यावेळी कामगिरीचे बक्षीस मिळेल अशी आशा होती, पण त्याला पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्येच स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.

हर्ष दुबेचेही टीम इंडियात पुनरागमन नाही

डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवडला गेला होता, पण त्यावेळी मानव सुथारला त्याच्यापेक्षा प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर वनडे मालिकेत हर्षला संधी मिळाली आणि त्याने दोन सामन्यांत चार विकेट्स घेत आपली छाप पाडली. श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर स्पिनर्सना चांगली मदत मिळते, त्यामुळे हर्ष दुबे संघासाठी प्रभावी पर्याय ठरू शकला असता. मात्र, यावेळीही त्याला संघाबाहेरच ठेवण्यात आले.

Maharashtra TimesIndia vs Sri Lanka Test Series : जड्डूचं पुनरागमन, 33 वर्षीय सारांशला पहिल्यांदा संधी; श्रीलंका कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

यश ठाकूरचे नशीब पालटले नाही

२७ वर्षांचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर हा देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत मेहनती गोलंदाज मानला जातो. ‘इंडिया ए’ आणि ‘श्रीलंका ए’ यांच्यातील मालिकेत त्याने अवघ्या दोन सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पण करत त्याने आपली ताकद दाखवून दिली होती. जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग मिळवण्यासोबतच चेंडू हवेत स्विंग करण्याची यशची क्षमता आहे. श्रीलंकेत जुना चेंडू स्विंग करणे महत्त्वाचे असते, त्यामुळे तो एक्स-फॅक्टर ठरू शकला असता. पण श्रीलंका कसोटी मालिकेसाठी त्यालाही संघात स्थान मिळालेले नाही.

एकंदरीत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करूनही या चार खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता आगामी हंगामात आणखी मेहनत घेऊन पुन्हा एकदा टीम इंडियाचे दार ठोठावण्याचे मोठे आव्हान या खेळाडूंसमोर असणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा