Headlines

फळपीक विमा योजना बाबत माडखोल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष


ओटवणे प्रतिनिधी : माडखोल गावातील कृषी अधिकारी व तलाठी यांनी फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा काजू बागायती नुकसानीचे बोगस पंचनामे केल्याची तक्रार गावातील एका व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने गावातील शेतकरी व बागायतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंजूर झालेली नुकसानभरपाई तातडीने वितरित करून स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये. अन्यथा सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील सर्व शेतकरी आपल्या मुलाबाळासह बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिला आहे.
माडखोल गावातील शेतकऱ्यांना २५ डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व सततच्या हवामान बदलामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने नुकसानभरपाई मंजूर केली आहे. मात्र गावातील एका व्यक्तीने त्यांच्या कौटुंबिक वादातून प्रेरित होऊन दिनांक २२ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज सादर करून शासनाकडे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित तक्रारीमध्ये स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांनी सुमारे २५० ते ३०० नुकसानभरपाई अर्जांपैकी जवळपास १०० अर्ज बोगस असल्याचे नमूद केल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र स्थानिक ग्राममहसूल अधिकारी, कृषी अधिकारी, पंच आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत सुमारे २४७ शेतकऱ्यांचे पंचनामे, जबाब, पंचयादी व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करून सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आली आहे. पंचनामे करताना जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. असे असताना, एका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण प्रक्रिया खोडसाळ, चुकीची व बोगस असल्याचा आरोप करणे हे सर्व शेतकऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांचे लक्ष वेधून त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे. यावेळी देवस्थानचे मानकरी दत्ताराम राऊळ, माडखोल सोसायटी चेअरमन तथा माजी उपसरपंच जीजी राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, बाळु शिरसाट, सोसायटी संचालक प्रकाश नाईक, आंनद राऊळ, सत्यवान राऊळ, सुबोध राऊळ, पांडुरंग राऊळ, मोहन राऊळ, मनोज राऊळ, स्वप्निल राऊळ, विनेश तावडे, बंटी सावंत, लखन आडेलकर, स्वप्निल आडेलकर आदी माडखोल गावातील शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत