अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू होते. तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जवळचे मित्र होते.

अखंड नामस्मरण हवं, कारण तेच प्रतिमांपलीकडे असलेल्या शक्तीची जाणीव करून देतं. ती जाणीव झाल्यानंतर त्या शक्तीचं स्वरूप जाणण्याची इच्छा मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी ‘त्या’चा अखंड आठव ठेवायचा. सतत त्याला साद घालायची. नेहमी त्याचंच नाव घ्यायचं. अगदी ‘जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम’सारखं. असं करायचं तर आपलं चौखुर बेभानपणे उधळणारं मन आपल्या ताब्यात हवं. भोवताली निसरड्या वाटा तर अगणित असतात. धनाची अनिर्बंध हाव, सत्तेची आस, मोठेपणाचा न संपणारा हव्यास, अहंकाराचा दर्प आणि चित्त सैरभैर करणारी विषयवासनेची कधीही न भागणारी भूक!
आपल्याला सतत दहाही दिशांना ओढणारे सुंदर, देखणे असे साप मन विचलित करतात. समोर दिसणाऱ्या मूर्तीवरसुद्धा मन एकाग्र करू देत नाहीत. ‘शरीर विटाळाचे जाळें। मायामोहपाशाचे जाळें। पतन शरीराच्या मुळे। शरीर काळें ग्रासिलें।।’ असं तुकाराम महाराजांचं सांगणं माहीत असलं, तरीही कृती त्याच्या विपरीतच घडते. नामस्मरणामुळं यात फरक पडत जातो. निंबाळचे गुरुदेव रानडे यांचा भर तर नेमावर म्हणजेच नामस्मरणावरच होता. रानडे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.
साक्षात्काराचे तत्त्वज्ञान सांगणारे रानडे म्हणत, ‘निर्गुणभक्ती म्हणजे ब्रह्म-माया-विवेक नव्हे, तर केवळ नामस्मरण… ध्यान म्हणजे श्वासांत नाम गोवणे किंवा नामाचे मौनाने स्मरण करणे. भक्ती म्हणजे टिळेमाळा नव्हे, तर अंतःकरणात उत्पन्न होणारा देवाविषयीचा भाव किंवा कळवळा. आणि धर्म म्हणजे धार्मिक गोष्टी किंवा दानधर्मही नव्हे, तर भावपूर्वक नामस्मरण करणे.’ या नामस्मरणाची सुरुवात सगुण रूपाला समोर ठेवूनच करायची; कारण तसं करणं सहज आणि सोपं आहे.
ती करता करता कधी तरी, केव्हा तरी जाणीव व्हायला हवी की फक्त या मूर्तीतच ‘ती शक्ती’ नाहीये, तर ती सगळीकडे आहे. पण हे आकळण्याचा मार्ग मूर्तीपूजेतून जातो. तुकाराम महाराज सांगतात, ‘ केला पाषाणाचा विष्णु। परि पाषाण नव्हे विष्णु। विष्णुपूजा विष्णूसी अर्पे। पाषाण राहे पाषाणरूपे।। ब्रह्मानंद पूर्णामाजी। तुका म्हणे केले कांजी। ज्याची पूजा तेणेंचि घेणें। आम्हा पाषाणरूप राहणे।।’

