Headlines

Pune Railway Station:पाण्याच्या दरावरून प्रवाशांची आर्थिक लूट; पुणे रेल्वे स्थानकावरील प्रकार ,रात्रीच्या वेळी रेलनीर ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री


Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर एक लिटर पाणी पाच रुपयांत तर बाटलीसह आठ रुपयांत असताना देखील काही ठिकाणी प्रवाशांकडून १५ रुपये उकळण्यात येत असल्याचे आढळून आले.

_पाणी बॉटल
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी ,पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर स्वस्त दरांत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉटर वेंडिंग मशिनमधून प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाण्याच्या दरावरून प्रवशांची लूट

एक लिटर पाणी पाच रुपयांत आणि बाटलीसह आठ रुपयांत उपलब्ध करून देण्याचा नियम असताना काही ठिकाणी प्रवाशांकडून १५ रुपये उकळण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

या आधी कारवाई तरी देखील गैरप्रकार थांबलेले नाही

पुणे रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून, दररोज सुमारे दीड लाख प्रवासी येथून ये-जा करतात. प्रवाशांना परवडणाऱ्या दरांत शुद्ध पाणी मिळावे यासाठी स्थानकावर दोन वॉटर व्हेंडिंग मशिन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, काही मशिनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. रेल्वे प्रशासनाने यापूर्वीही अशा प्रकारांवर कारवाई केली असली, तरी गैरप्रकार थांबलेले नसल्याचे दिसत आहे.

Maharashtra TimesJaigad Port to Satara Expressway: कोकण-पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढणार; जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी NHAIकडून हालचाली सुरू

संबंधित चालकांना आकारला १३ हजारांचा दंड

रेल्वे प्रशासनाने जादा दर आकारणीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. तिकीट तपासणी पथकांकडून नियमित तपासणी केली जात असून, बनावट ग्राहक पाठवूनही चौकशी केली जाते. गेल्या आर्थिक वर्षात दोन तक्रारींवरून संबंधित चालकांना १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. चालू वर्षातील चार महिन्यांत आणखी साडेपाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.प्रवाशांनी दर्शविलेल्या दरापेक्षा जादा पैसे देऊ नयेत आणि अशा प्रकाराची माहिती तत्काळ रेल्वे हेल्पलाइनवर द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Maharashtra TimesPune News: पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ

रात्रीच्या वेळी कारवाईची गरज

रेल्वे स्थानकावर विशेषतः रात्रीच्या गर्दीच्या वेळी ‘रेलनीर’ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री होत असल्याचेही दिसून येत आहे. विविध मार्गांनी पाणी आणून ही विक्री केली जात असल्याने रेल्वेचा महसूल बुडत असून, रेल्वे सुरक्षा दल आणि प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेआहे. वारंवार दंडात्मक कारवाई होऊनही गैरप्रकार सुरूच असल्याने संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा