![]()
आषाढी वारी 2026 दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत 7 लाख 47 हजार 178 वारकरी भाविकांवर मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असून, विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. आषाढीवारी दरम्यान पालखी मार्ग आणि पंढरपूर येथील आरोग्य शिबिरांमध्ये 7 लाख 42 हजार 731 बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले. 4 हजार 447 रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली, तर 1 हजार 600 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. वारीदरम्यान संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवरही प्रभावी उपचार करण्यात आले. त्यामध्ये 40 हजार 933 तापाचे रुग्ण, 11 हजार 486 उच्च रक्तदाबाचे रुग्ण, 9 हजार 973 मधुमेहाचे रुग्ण, 23 हजार 102 तीव्र श्वसन संसर्ग रुग्ण, 19 हजार 477 अतिसार , 5 हजार 455 आमांशाचे (डिसेंट्री) रुग्ण, तसेच 214 रस्ते अपघातग्रस्त, 51 हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण, 365 श्वानदंशाची प्रकरणे आणि 1 सर्पदंशाचे प्रकरण यांच्यावर उपचार करण्यात आले. याशिवाय 3 क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले असून इतर 6 लाख 29 हजार 629 रुग्णांनाही आवश्यक आरोग्य सेवा देण्यात आली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर 353 रुग्णवाहिका, 69 सुसज्ज आयसीयू, 156 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, 215 आरोग्यदूत, 3,087 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि 302 तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत होते. याशिवाय प्रथमच एअर ॲम्बुलन्स सेवा, ‘आरोग्यसंपन्न वारी’ वेब ॲप, पंढरपूरमधील 24 तास आयसीयू सुविधा, महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य जनजागृती आणि डिजिटल मॅपिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या या सेवेमुळे वारीमध्ये आजारी पडलेल्या वारकऱ्यांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे.
Source link
आषाढी वारी 2026:वारीदरम्यान 7 लाख 47 हजार बाह्यरुग्णांना मोफत सेवा, मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार
