बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव : पंचायत मंडळाचाही ठरावाला पाठिंबा
त. भा. प्रतिनिधी
फोंडा : फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी परिसरात होऊ घातलेल्या आयआयटी गोवा कॅम्पसला बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत जोरदार विरोध करण्यात आला. तसा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला असून पंचायत मंडळानेही त्याला पाठिंबा दिला आहे. हा विषय केवळ आयआयटी पुरता मर्यादित नसून फर्मागुडी पठारावरील जलस्रोत, पारंपरिक भाजीमळे यासह एकंदरित जैवविविधतेच्या संवर्धनाचा आहे. बांदोडा गावाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कटमगाळ दादांच्या स्थानाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अबाधीत राखण्यासाठी हा संपूर्ण परिसर ‘नो डेव्हलोपमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्याची मागणीही ग्रामसभेत करण्यात आली.
सरपंच चित्रा फडते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या या ग्रामसभेत गावणे दहाजण समाजासह वैयक्तिक पातळीवर आयआटीला हरकत घेणारे सर्वाधिक लेखी प्रश्न सभेच्या कामकाजात होते. त्यामुळे आयआयटीला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. फर्मागुडीचा पठार व येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री कटमगाळ दादांच्या परिसराला बांदोडा गावच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. गावातील विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पूर्वापार या स्थानाशी जोडल्या गेल्या आहेत. शिवाय बांदोडा व वेलिंग गावातील पारंपरिक भाजीमळे, जलस्रोत व पर्यावरण या पठारावरील जैवविविधतेवर अवलंबून आहे. आयआयटी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम होणार आहे. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील पाण्याचे स्रोत नष्ट होतील व त्याचा थेट परिणाम गावणे व बांदोडा गावाच्या पायथ्याशी असलेले नाले, झरी व विहिरींवर होणार आहे. तेथील मलनिस्सारणाचे दूषित पाणी नैसर्गिक झऱ्यांसोबत डोंगरावऊन गावातील पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. गोवा अभियांत्रिकी परिसरात खोदण्यात आलेल्या बोअरवेलमुळे सध्या गावातील पाण्याचे स्रोत अडचणीत आले आहेत, असे काही ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या निदर्शनास आणून दिले.
गावणे येथील पारंपरिक शिमगोत्सव, धालोत्सव व अन्य उत्सवांच्यावेळी कटमाळ दादांच्या स्थानाकडे जाणाऱ्या पायवाटांमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. कटमगाळ दादाच्या दर्शनासाठी बुधवार व रविवारच्या दिवशी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनाही त्याचा त्रास होणार आहे. शिवाय कटमगाळ राखणदाराच्या अदृष्य फेरीच्या वाटामध्येही अडथळे निर्माण होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आयआयटीचा आवाका मोठा असल्याने त्याचा विविध प्रकारे ताण गावातील प्राथमिक सुविधांवर येणार आहे. आयआयटीमुळे बांदोडा पंचायत क्षेत्रावर होऊ घातलेली ही संकटे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकजुटीने या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.
जमिनी राखण्यासाठी ‘39 ए’ रद्द करण्याची मागणी
बांदोडा पंचायत क्षेत्रातील फर्मागुडी व आसपासच्या डोंगर माथ्यावरील जैवविविधता राखून ठेवण्यासाठी हा संपूर्ण परिसर ‘नो डेव्हलोपमेंट झोन’ म्हणून जाहीर करावा. सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी जमिनी विकत घेऊन त्या भूखंड म्हणून विकसित करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्याला आळा घालण्यासाठी नगर नियोजन खात्याचे कलम ‘39 ए’ रद्द करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. आयआयटी प्रकल्प सरकारी जागेत होत असला तरी त्याविरोधात न्यायालयात लढा देण्याची तयारीही ठेवावी लागेल, अशा सूचनाही ग्रामस्थांनी मांडल्या.
वित्त आयोगाच्या निधीचा वापर विधायक गोष्टींसाठी करा
पंचायतीला मिळणाऱ्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीचे पैसे मागील तीन वर्षांपासून वापराविना पडून असल्याने या निधीत कपात झालेली आहे. या निधीच्या पैशातून केवळ गटारे बांधण्यापेक्षा तो शैक्षणिक संस्था व पंचायत क्षेत्रातील लोकोपयोगी उपक्रमांसाठी वापरण्याची सूचना ग्रामस्थांनी केली. सध्या पंचायतीकडे वित्त आयोगामार्फत मिळालेले ऊ. 1 कोटी 33 लाख पडून आहेत. त्याचा वापर विधायक गोष्टींसाठी करावा. तसेच गावणे येथे बांधण्यात आलेल्या गटाराचे काम निकृष्ट व सदोष असल्याने कंत्राटदाराला त्याचे पैसे देण्यापूर्वी ग्रामविकास समितीमार्फत त्याची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
सोपो कर वसुलीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
पंचायतीच्या सोपो कर वसुलीमध्ये लाखो ऊपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्यात खुद्द एक पंचसदस्यच सहभागी आहे. त्याचे नावही ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. या गैरव्यवहारामुळे पंचायतीचे साधारण ऊ. 4 लाख बुडाल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत दिनेश गावणेकर, अॅड. सुरेल तिळवे, गुऊदास बांदोडकर तसेच अन्य काही ग्रामस्थांनी आयआयटी व अन्य मुद्यांवर महत्त्वाच्या शिफारसी व सूचना मांडल्या. अकरा पंचसदस्यांपैकी दहाजण उपस्थित होते. पंचायत सचिव कृष्ण गावडे यांनी इतिवृत्त वाचून कायम केले. सरपंच चित्रा फडते यांनी आभार मानले.
