माऊली म्हणतात, ज्यांना ईश्वर आपला हितचिंतक आहे ही खात्री असते ते पूर्णपणे त्याच्यावर आपला भार टाकतात आणि प्रेमभराने त्याला शरण जातात ते मायानदी सहजी तरुन जातात पण जे स्वत:ला कर्ता समजत असतात ते मात्र मायानदीत गटांगळ्या खात राहतात. असे लोक दुष्कर्मी, मूर्ख व दुराचारी असतात. त्यांची विचारशक्ती नष्ट झालेली असते. त्यांच्या ज्ञानावर मायेने घातलेल्या अज्ञानाच्या पांघरुणामुळे ते आसुरी मार्गाचा अवलंब करत असतात. अहंकारामुळे त्यांना आत्मस्वरुपाची विस्मृती झालेली असते. विषयोपभोगात रममाण झाल्यामुळे त्यांना ईश्वराची प्राप्ती होत नाही.
ईश्वराची भक्ती माणसाला अलगदपणे त्याच्यापर्यंत घेऊन जाते हे सांगितल्यावर येथून पुढे भगवंत चार प्रकारच्या सदाचारी भक्तांबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, सर्वभावाने मला भजणारे, चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. त्यामध्ये दु:खाने ग्रस्त झालेल्या, आत्मज्ञानाची इच्छा बाळगणाऱ्या, द्रव्याची इच्छा करणाऱ्या आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तरी निरपेक्षतेने माझी भक्ती करणाऱ्या भक्तांचा समावेश होतो.
भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना। ज्ञानी तसे चि जिज्ञासु हितार्थी आणि विव्हल ।। 16 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्यांना त्यांचे हित कायम वाढते असावे असे वाटते असे चार प्रकारचे भक्त मला भजतात.
पहिल्या प्रकारचा भक्त दु:खाने पिडलेला असतो. दुसरा आत्मज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा बाळगणारा असतो. तिसऱ्याला द्रव्याची इच्छा असते आणि चौथ्या प्रकारचा भक्त ज्ञानी असतो. जरी हे सर्व सदाचारी असले तरी पहिल्या तीन प्रकारच्या भक्तांना माझ्याकडून काही ना काही अपेक्षा असते मात्र चौथ्या प्रकारचा भक्त आत्मज्ञानी असल्याने तो माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी माझी भक्ती करत असतो. तो माझ्याशी अनन्य होऊन माझी नित्य भक्ति करत असल्याने तो श्रेष्ठ भक्त असतो. त्याचे माझ्यावर अत्यंत प्रेम असते आणि मीही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. आत्मज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्यातील द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होऊन तो ब्रह्मैक्याने माझेच रूप होतो आणि माझे रूप होऊनसुद्धा माझी भक्ती करत असतो.
पुढे माउली ज्ञानी भक्ताबद्दल सांगताना म्हणतात, खरं तर स्फटिक पाण्यापेक्षा वेगळा असतो परंतु काहीवेळा त्याच्या पारदर्शकतेमुळे तो पाण्यासारखा भासतो, तसा इतर लोकांना ज्ञानी भक्त, त्यांच्याप्रमाणेच देवाची पूजाअर्चा आणि इतर व्यवहार करणारा करत असल्याने, त्यांना तो त्यांच्यासारखाच वाटतो आणि त्यामुळे तो आणि भगवंत वेगळे आहोत असे ते समजतात. तो देवाहून वेगळा दिसतो कारण देवाची भक्ती करायला मिळावी म्हणून तो देवाहून वेगळा होतो. ज्याप्रमाणे आकाशात वारा विरला, म्हणजे त्याचे वारेपण वेगळे रहात नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी एकरूप झाला तरी त्याची भक्त ही प्रतिमा तशीच राहते.
क्रमश:
