वारीमध्ये पावले अनेकदा चालली, मात्र पंढरपुरातील देवळात प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन एकदाच झाले. दिवस अर्थातच आषाढातले नव्हते, बहुधा दिवाळीनंतरचे पौष-मार्गशिर्षाचे होते. तरी गर्दी होतीच. कुठल्याही देवळाच्या गदारोळातून शेवटी जितकी गुंजभर भक्ती आपल्यापाशी उरेल तितकीच भक्ती मनात उरून मी जेव्हा मूर्तीपाशी पोचले तेव्हा भक्तीपेक्षाही उत्सुकता होती त्या विठ्ठलमूर्तीच्या दिसण्याची, रूपाची; जिने भल्याभल्यांना नादावले. खुळावले. त्या मूर्तीची, जिच्यासाठी काही लाखांचा जनसमुदाय शतकानुशतके पंधरा-सतरा दिवस पायी चालत येतो. देहू-आळंदीपासून चालत येण्याचा हा प्रघात. प्रत्यक्ष संतानी ज्या मूर्तीसाठी वाट मळवली त्या विठ्ठलाची मूर्ती पाहण्याची ओढ प्रत्येक मराठी मनाला असतेच. मीही त्याला अपवाद नाही. नव्हते. एरवी नामदेवांच्या पायरीवरच माथा टेकवावा. देवळाच्या कळसाचे दर्शन घ्यावे, चंद्रभागा पाहावी नि मागे फिरावे. फार फार तर रुक्मिणीला भेटून जावे.
गर्दीच्या ओळीतून पांडुरंगाच्या मूर्तीपाशी पोचले तर मनावर कोरलेले तेच परिचित असे रूप. ‘तुळशीमाळा गळा, कासे पितांबर, कस्तुरी लल्लाटी’. दाग-दागिने, तुळशीमाळा, झळझळीत पितांबर, शेला, कटेवर हात, डोईवर मुकूट आणि काळा वर्ण. ‘रत्नकीळ फांकती प्रभा!’ ज्ञानेश्वरांनी केलेले वर्णन साक्षात समोर उभे ठाकते. इथवर येण्यात झालेले कष्ट, केलेले श्रम सार्थकी लागल्याचा श्वास मनात दाटतो न दाटतो तेवढ्यात ज्या पायांवर ज्ञानेश्वर-नामदेव-तुकारामादी संतांनी माथा टेकला ती पावले दिसतात. पांडुरंगाच्या देवळातली मूर्ती ‘एकोटीच’ समोर येत नाही तर शब्द-सुरांच्या लडी घेऊनच पुढ्यात उभी राहते. ‘पाया पडू गेलें तंव।पाऊलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे। समोर कीं पाठिमोरा न कळे।’ शब्द असे की प्रत्येक शब्दावर जीव ओवाळून टाकावा, आणि सूर असे की देहाचाच कान व्हावा.
ज्या रूपाचे वर्णन खुद्द ज्ञानेश्वरांनीच केले ते रूप किती महान! मूर्तीपाशी पोहोचताना आपल्यालाच आपल्या मनातला गोंधळ कळत नाही की देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहोत की देवात सामावलेल्या त्याच्या भक्तांना भेटण्यासाठी जात आहोत? ज्या विटेवर ती मूर्ती अठ्ठावीस युगे उभी आहे त्या विटेलाच विळखा घालताना मला पाहून कुणीसे घाईघाईने ओढून मला बाजूला केले तेव्हा पुन्हा नजर पाडुरंगाच्या मुखाकडे गेली. दर्शनाचा खेळ काही क्षणांचाच. तेवढ्या अवधीत जे साठवता आले ते साठवावे आणि बाजूला व्हावे. तिथून बाजूला झाले खरी, पण इतक्या जवळून पाहिल्यामुळे मूर्तीच्या चेहऱ्यावर असलेला खडबडीतपणा नवल उमटवून गेला. आश्चर्य वाटले की विठ्ठलाच्या सगळ्या वर्णनांमध्ये मूर्तीवर असलेला हा खडबडीत पोत मी कधी कुठे ऐकला, वाचला नव्हता. किमान कल्पिला नव्हता. वाटले विठ्ठल हाही कृष्णरूप, पण कृष्णाच्या निळ्या रूपाला नितळपणा आहे. या विठ्ठलमूर्तीचा पोत निराळा. एरवीही सगळ्या देवांच्या मूर्तीत साधारणपणे तुकतुकीत नितळपणा असतो.
राम-कृष्णांचा वर्ण पोथ्या-पुरांणानुसार निळा, पण खरा तर तोही रंग काळाच असावा. पंढरपुरात नांदते ते कृष्णाचेच प्रतिरूप म्हणून संतांनी भक्ती केली. देवत्वाच्या सगळ्या कांडातून बाहेर काढून कृष्णाने ‘देव’ या कल्पनेलाच संसार सन्मुख केले. बालपणी दह्या-दुधाची चोरी केली, यशोदेजवळ व्रात्यपणा केला, तरुणपणी गोप-गोपींसह रासलीला केली, युद्धाचे सारथ्य केले आणि कुरुक्षेत्रावर गीतोपदेशही केला. राधेवर निःसीम प्रेम केले, पण रुसलेल्या बायकोची, रुक्मिणीची समजूत काढायला तो दिंडीरवनात आला आणि विठ्ठल होऊन आया-बाया, बाप्यांचा देव झाला. संतांनी विठ्ठलाचे अपार कौतुक केले आहे. इतके कौतुक की कौतुक करताना त्यांचे शब्दच तेज पुंजाळतात. त्यांच्यासाठी पंढरपूरात चंद्रभागेतीरी गोकुळीचे घननीळ रूपच अवतरले आहे.
विठ्ठल हे दैवत एक आश्चर्य आहे. शब्द आणि सूर ‘विठ्ठल’ शब्दातच एकत्र येतात म्हटले तशा अजून कितीतरी प्रतिमा ‘विठ्ठल’ नावाशी एकत्रितच निगडित असतात. विठ्ठलाला कृष्णरूप म्हणावे तर कृष्णाच्या रासलीला आणि गोपींचा फेर विठ्ठलाच्या प्रतिमेशी जुळत नाहीत. म्हणे की रुक्मिणीचा रुसवा काढायला आलेला कृष्ण आपल्या गाई-गोपाळांसह गोपाळपुरात आला, पण रुक्मिणीला भेटायला पुढे मात्र एकटाच दिंडीरवनात गेला. तोच हा विठ्ठल. त्याचवेळी सांगितले जाते की तो अठ्ठाविस युगे एकाच विटेवर उभा आहे आणि ती वीट पुंडलिकाने त्याच्या दिशेने फेकली आहे. म्हणजे अठ्ठावीस युगांपूर्वी कुणी एक पुंडलिक होता, ज्याने देवाची भक्ती केलीच नाही तर आई-बापांची सेवा केली आणि त्याच्या त्या सेवेवर संतुष्ट होऊन देव कैलासातून पंढरपुर क्षेत्री अवतरला. हा कैलासातून अवतरलेला देव विष्णू आहे.
कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार म्हणजे आधीच विटेवर विठ्ठल म्हणून अवतरलेला विष्णू आठव्या रूपात रुक्मिणीची समजूत काढणारा विठ्ठल होऊन कसा आला ? कोडेच आहे. कुणी म्हणे की विठ्ठल शिव आहे, विष्णुरूप शिव आहे. म्हणजे शैव आणि वैष्णव दोन्ही पंथांतले द्वैत यात नाही. तो लोकदेव, धनगरांचा देव आहे. हा देव पदुबाई नावाच्या गौळणीचा पती आहे. तिचीही तिच्या नवऱ्याशी फारकत झालेली आहे. विठ्ठल-पदुबाईच्या ओव्या वारीत बायकांच्या मुखात आहेत. मात्र देवळात आहे ते विठ्ठल आणि पदुबाई नाहीत किंवा कृष्ण आणि रुक्मिणी नाहीत तर विठ्ठल आणि रुक्मिणी आहे म्हणजे पदुबाईच पुढे रुक्मिणी झाली आणि कृष्ण विठ्ठल होऊन पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठावीस युगे उभा राहिला.
आता यासोबतच पंढरपूर क्षेत्र, चंद्रभागा, तिचा तीर आणि भीमा नदी, कानडा विठ्ठल, कर्नाटकु हे शब्द येतात म्हणजे हे क्षेत्र कर्नाटकाचे, विठ्ठल कानडा आहे तरीही मराठी मनाला त्याचे अप्रूप आणि सावळा असलेला विठ्ठल पांडुरंग (गोरा) कांतीही आहे. शतकांच्या उलथणीत अनेक संप्रदाय आले-गेले पण विविध धारांचा संगम असा तो भागवतधर्मी विठ्ठल लोकांत सामावला आणि सामावलेलाच राहिलेला आहे हे आश्चर्य. असे यात काय वेगळे की ‘येणें मज लावियला वेधु’ म्हणून खुद्द ज्ञानेश्वरांनी आळवावे? देवळातून बाहेर येत मी नामदेवांच्या पायरीपाशी येते. विठ्ठलाचे रूप पाठपुरावा करतच असते.
हा देव असा, जो भक्ताची वाट पाहतो. अगदी अठ्ठावीस युगे सुद्दा. तो जनाबाईची लुगडी धुतो. तिच्यासोबत दळण-कांडण करतो. तिच्या रोजच्या कामात हातभार लावतो. तो कान्होपात्रेचाही देव असतो. श्रीखंड्या होऊन एकनाथांच्या घरी राबतो. पाणी भरतो. हा देव चोखोबाला मंदिरात प्रवेश नाकारताच भिंतच ढासळवतो आणि चोखोबाला दर्शन देतो. याच्या भक्तमेळ्यात गोरा हा कुंभार आहे, सावता माळी आहे, नरहरी सोनार आहे, तुकाराम वाणी आहे आणि ज्ञानेश्वरादी भावंडे, एकनाथ असे ब्राह्मण, पण वाळीत टाकलेले ब्राह्मण आहेत. हा तुकारामाचे शब्द तारतो. या देवाला जात मान्य नाही. पंथाचा भेदाभेद नाही. लोकांत सामावलेला लोकांचा देव हा. अगदी आजही सामान्यांतील सामान्य माणूस ‘माऊली’ म्हणत सहज पाया पडतो, गळाभेट घेतो. ना स्त्री ना पुरुष भेद जाणतो. लोकांत सामावलेला हा देव विष्णुच्या चोवीसही अवतारात मावत नाही.
नामदेवांच्या पायरीवरून मी रस्त्यावर येते तर खांद्यावर घोंगडी घेतलेला कुणी सावळासा समोर येतो. क्षणभर ओझरती नजरानजर होते. अचानक आकळते की विठ्ठलाच्या चेहऱ्यावर असलेला मृदू भाव हा त्याच्या खडबडीतपणातूनच पाझरतो आहे. तो ‘देव’ होऊन दूरस्थ न राहता मानव्य रूपाचा होतो आणि म्हणूनच तो प्रत्येकाला आपला वाटतो. विठ्ठलामध्ये देवत्व कोंदाटलेले नाही तर ओसंडत्या तलावातून पाणी पाझरावे तसे त्याने माणसांमध्येच देवत्व पाझरले आहे. आणि म्हणूनच हा चोवीसावेगळा! सावळा असूनही पांडुरंग कांती! एकाचवेळी तो पुंडलिकाचा असतो, रुक्मिणीचा असतो, संतांचा असतो आणि तुमचा आमचाही होतो. तुकाराम-ज्ञानेश्वर काळापासून अखंड चालत आलेल्या वारीत तो सामावलेला असतो. माणूस होऊन. ‘तुका म्हणे जे बोला। ते ते साजे विठ्ठला।।’
जय हरी विठ्ठल!

