Headlines

सहकारी बँकेचा संचालक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात:एसटीच्या बिलासाठी 5 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल




बारामती येथे एसटीच्या प्रलंबित बिलासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका सहकारी बँकेच्या संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. अनिल बंकर (वय 51, रा. पापर्डे, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने एसटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई येथे स्टेट ट्रान्सपोर्टचे कंत्राटी काम केले होते. या कामाचे एकूण 48 लाख 60 हजार 455 रुपयांचे बिल मंजूर झाले होते. यापैकी 40 लाख रुपये तक्रारदाराला मिळाले होते, तर उर्वरित 8 लाख 60 हजार 455 रुपये मिळणे बाकी होते. तक्रारदाराने उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी पाठपुरावा केला असता, बँकेचे संचालक अनिल बंकर यांनी बिल मंजूर करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. नंतर तडजोडीअंती ही रक्कम चार लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. या प्रकारानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बारामती एसटी स्टँडसमोरील एका चारचाकी वाहनात सापळा रचण्यात आला. अनिल बंकर यांनी तक्रारदाराकडून चार लाख रुपये स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक विनोद ढेबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईला पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास त्यांनी तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत