Headlines

हॅपी बर्थडे देवाभाऊ!:देवेंद्रजींचा प्रवास ध्येय, मेहनत, शिस्त आणि लोककल्याणाच्या बांधिलकीचा; वाचा एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख




महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सखोल अभ्यास, अथांग परिश्रम आणि दूरगामी विचारांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दिव्य मराठी’ मध्ये मला त्यांच्याविषयी लिहायला मिळतंय याचा आनंद आहे. मी देवेंद्रजींना निरोगी, उदंड आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. वर्तमानातील राजकारणात सर्वाधिक परिपक्वता लाभलेला नेता कोणता, याचं उत्तर नि:संशयपणे देवेंद्र फडणवीस हेच आहे. अथांग अभ्यास, समयसूचकता, धोरणात्मक चातुर्य, दूरदृष्टी, संयम आणि संवेदनशीलता या सर्व गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. तसं तर देवेंद्रजींना आपण सगळेच अनेक वर्षांपासून पाहतोय. अगदी देशातले सर्वात तरुण महापौर असतांना पासून त्यांच्याविषयी माझ्याही मनातही नेहमीच कुतूहल राहिले. पुढच्या काळात त्यांच्याबरोबर इतक्या जवळून काम करायला मिळेल असं कधी वाटलं नाही. आणि आज महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची विकास गाथा लिहिली जात असतांना खऱ्या अर्थानं त्यांच्यातील अभ्यासू, धोरणी आणि दूरदृष्टीचा अनुभव पदोपदी येतो. विधिमंडळात आमदार म्हणून त्यांनी गाजवलेली कारकीर्द सर्वांच्याच स्मरणात आहे. कोणत्याही विषयाचे सखोल आकलन आणि विरोधी पक्षांत असतानाही अत्यंत संयमित, मोजक्या व वजनदार शब्दांत त्यांनी केलेली भाषणं नेहमीच मार्गदर्शक ठरायची. त्या काळात केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे काँग्रेसची एकहाती सत्ता असतानाही देवेंद्रजींचा अभ्यास आणि वक्तृत्व अधिकच उजळून निघाले, ज्यामुळे विरोधी पक्षांतील आमदारही त्यांचे चाहते बनले आणि तीच लोकप्रियता आजही कायम आहे. काही व्यक्तींना पदांमुळे मोठेपण मिळत नाही, तर त्यांच्या कृतीतून, विचारांतून आणि संकटसमयी घेतलेल्या धाडसी निर्णयातून त्या जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात; देवेंद्रजी हे अगदी त्याच पठडीतील नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा पट पाहताना त्यांची अभ्यासू वृत्ती, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी आणि प्रत्येक अडचणीकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन ठळकपणे उठून दिसतो. सार्वजनिक जीवनात असंख्य सोबती भेटतात, परंतु काही बंध हे निव्वळ राजकीय समीकरणांपुरते मर्यादित राहत नाहीत. देवेंद्रजी आणि माझ्यातील बंध अशाच विश्वासावर आधारलेले आहेत. मुंबई ते पुणे हा द्रुतगती महामार्ग जसा शिवसेना भाजप सरकारच्या युतीची पहिली मोठी उपलब्धी होती तशीच मुंबई ते नागपूर ‘समृद्धी महामार्ग’ ही महायुती सरकारची पहिली मोठी उपलब्धी ठरली आणि त्याचे शिल्पकार अर्थातच देवेंद्र जी होते. मलाही या सगळ्या काळात एक सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून या महामार्गाच्या निर्मितीत योगदान देता आलं यासाठी भाग्यवान समजतो. सत्तेत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात—काही निर्णय लोकप्रिय असतात, तर काही अत्यंत कठीण. अशा वेळी नेतृत्वामध्ये अथांग धैर्य आणि आत्मविश्वास असावा लागतो, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचा काळ होय. तो क्लिष्ट आणि नाजूक विषय त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये संवेदनशीलतेने हाताळला, ते खरोखरच वाखाणण्याजोगे होते. विषयाचे स्वरूप किंवा व्यक्तीचे स्थान लहान असो वा मोठे, देवेंद्रजी ज्या बारकाईने त्या विषयाचा अभ्यास करतात, तितक्या तळाशी जाणारे नेते दुर्मिळ आहेत. त्यांची पूर्वतयारी इतकी चोख असते की प्रशासकीय सचिवांनाही बैठकांना येताना दुप्पट अभ्यास करून यावे लागते, हा अनुभव आम्हाला आजही नेहमी येतो. एखादा प्रश्न केवळ ऐकून घेणे आणि त्याच्या मुळाशी जाऊन तो समजून घेणे यात मोठा फरक असतो, अन् देवेंद्रजी नेहमी प्रश्नाच्या मुळाशी हात घालतात. मोठ्या जबाबदाऱ्या पेलताना तणाव, टीका आणि राजकीय चिखलफेक ठरलेली असते; परंतु देवेंद्रजींचा शांत संयमी चेहरा ढळलेला मी क्वचितच पाहिला आहे. बिकट परिस्थिती शांतचित्ताने हाताळण्याची त्यांची शैली खास आहे, ज्यामागे त्यांचा व्यासंग आणि प्रचंड आत्मविश्वास आहे. धावपळीच्या दौऱ्यात हेलिकॉप्टरमधील बिघाडासारख्या गंभीर प्रसंगांनाही त्यांनी तोंड दिले, परंतु आपल्या खंबीर मनोवृत्तीने त्यांनी या संकटांचा सामना केला महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही कित्येक ऐतिहासिक निर्णय घेतले. राज्याच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पावर त्यांची दृष्टी अत्यंत स्पष्ट होती. मेट्रोचे नेटवर्क विस्तारणे असो, समृद्धी महामार्गाचा वेग वाढवणे असो, मुंबईतील पायाभूत प्रकल्प असोत किंवा परदेशी गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न—प्रत्येक ठिकाणी विकासाच्या ध्येयासोबतच ‘शेवटच्या घटकाला याचा काय लाभ होईल’ यावर त्यांचा विशेष कटाक्ष असायचा, ज्यामुळे छोट्या-मोठ्या त्रुटी तातडीने दूर व्हायच्या. आज ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांनाही मागे टाकले आहे. या प्रदीर्घ कालावधीत तणावाचे क्षण नक्कीच आले असतील, पण त्यांनी तो ताण कामाच्या वेळी कधीही जाणवू दिला नाही. उलट गंभीर चर्चा चालू असताना योग्य प्रसंगी एखादा मिश्कील टोमणा मारून वातावरण हलके करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. राजकारणात मतभेद होतात, राजकीय समीकरणे बदलतात; परंतु काही व्यक्तींबद्दलचा आंतरिक आदर कायम राहतो. देवेंद्रजींबद्दल माझ्या मनात हीच भावना कायम राहिली, कारण त्यांनी प्रत्येक आव्हानाला वैयक्तिक न मानता राज्याच्या हिताच्या दृष्टीने पाहिले. सार्वजनिक जीवनात संयम आणि संवादाचा समतोल राखणे कठीण होत असताना त्यांनी या दोन्ही गोष्टींचे संतुलन उत्तमरीत्या साधले आहे. २०२२ मध्ये आम्ही शिवसेनेत क्रांती घडवून आणली, जनतेच्या सुप्त भावनांना मार्ग मोकळा करून दिला आणि शिवसेनेत नवीन चैतन्य फुंकले. त्या अत्यंत आव्हानात्मक आणि संघर्षाच्या काळात देवेंद्रजी अत्यंत ठामपणे माझ्या आणि शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. महायुती सरकारच्या काळात आपण विकासकामांचा धडाका लावला. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, पायाभूत सुविधा, गुंतवणूक परिषदा, उद्योगांना चालना आणि ग्रामीण भागाचा कायापालट—प्रत्येक विषयात देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट होती. “सामान्य माणसाला याचा काय प्रत्यक्ष फायदा?” हा त्यांचा एकच प्रश्न कामाची दिशा नक्की करायचा. जलयुक्त शिवार, धनगर आरक्षण, सीएम फेलोशिप, अनाथ आरक्षण यांसारख्या निर्णयांतून त्यांच्या इच्छाशक्तीचे दर्शन घडले. नुकतीच त्यांनी शेतकऱ्यांचे सुमारे ४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा करून मास्टरस्ट्रोक मारला आहे; आपण केवळ पायाभूत प्रकल्पांपुरते मर्यादित नसून शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या भल्यासाठी ठोस पावले उचलणारे आहोत, हेच त्यांनी यातून सिद्ध केले. गेल्या वर्षी आम्ही राज्याचे व्यापक गृहनिर्माण धोरण आखले, ज्यातून महाराष्ट्र झोपडीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. अशा अनेक दूरगामी निर्णयांमध्ये देवेंद्रजींनी भविष्याची दिशा दाखवत आम्हाला मार्गदर्शन केले आहे. कोविडसारख्या भीषण संकटात ते विरोधी पक्षात असतानाही त्यांनी परिस्थितीचा बारीक अभ्यास करून अधिकारी, तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद ठेवला. संकटाची मालिका कितीही मोठी असली तरी न डगमगता मार्ग काढणे हा त्यांचा स्वभाव आहे. देवेंद्रजींची आणखी एक मोठी खासियत म्हणजे ते राजकीय मतभेदांना वैयक्तिक वैमनस्याचे रूप कधीही देत नाहीत. राजकारणात कडू चर्चा आणि टीका-टिपणी होते; पण विषय संपताच ते पुन्हा त्याच मोकळेपणाने संवाद साधतात, ही वृत्ती सार्वजनिक जीवनात दुर्मिळ आहे. मोठ्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्यांची सूक्ष्म नजर अनुभवायला मिळायची. काम कुठे अडकले आहे, प्रगती किती झाली आणि पुढील टप्पा काय—यावर ते अचूक बोट ठेवायचे, ज्यामुळे प्रशासन नेहमी सतर्क राहायचे. कामातील शिस्त आणि वेळेचे गणित याला ते सर्वोच्च प्राधान्य देतात. महायुतीच्या या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय यंत्रणेत अमूलाग्र बदल घडवून आणले, ज्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीत मोठा सकारात्मक बदल झाला आहे. अनावश्यक नियमांचे ओझे कमी करत त्यांनी सुधारणा आणल्या; चांगल्या कामाची पाठीवर थाप मारली आणि प्रसंगी कान टोचायलाही ते मागे हटले नाहीत. या स्पष्टवक्तेपणामुळे प्रशासनात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. आजही पूर असो, दुष्काळ असो वा कोणतीही आपत्ती—देवेंद्रजी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेण्यात नेहमी पुढे असतात. बाधितांशी थेट संवाद साधणे, प्रशासनाला सूचना देणे आणि मदतीचा सातत्याने पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यशैली आहे. बाधितांच्या डोळ्यांत पाहून त्यांना धीर देणे ही नेतृत्वाची मोठी जबाबदारी त्यांनी निष्ठेने पेलली आहे. त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीचे मला अनेकदा नवल वाटते. महिन्यांपूर्वीच्या बैठकीतील चर्चा, एखाद्या प्रकल्पाची टक्केवारी किंवा अधिकाऱ्याला दिलेली सूचना त्यांना तंतोतंत आठवते, ज्यामुळे प्रत्येक बैठक केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष कामाचा आढावा घेणारी बनते. तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग ही त्यांची आणखी एक जमेची बाजू आहे. कारभार पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख व्हावा यासाठी त्यांनी डिजिटल प्रणालींना सातत्याने पाठबळ दिले असून भविष्यातील महाराष्ट्राची आखणी करताना त्यांचा दृष्टिकोन नेहमीच आधुनिक राहिला आहे. विकसित भारताच्या प्रवासात महाराष्ट्राचे योगदान खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठीची ब्ल्यू प्रिंट देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे. आम्ही एकत्र केलेले असंख्य दौरे, हेलिकॉप्टरमधील प्रवास, एका कार्यक्रमातून दुसऱ्या कार्यक्रमाकडे जातानाचा वेळ किंवा रात्री उशिरा बैठकीनंतर चहाच्या चुस्कीसोबत झालेल्या गप्पा—या सर्व प्रसंगांत मला त्यांच्यातील एक वेगळाच माणूस अनुभवायला मिळाला. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणारा नेता छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो, सहकाऱ्यांची आस्थेने विचारपूस करतो आणि सामान्य कार्यकर्त्याचे नावही लक्षात ठेवतो; ही माणसे जोडण्याची ताकद प्रत्येकाकडे नसते. माझ्या दृष्टीने संकटातही न डगमगणारा आत्मविश्वास ही देवेंद्रजींची सर्वात मोठी ताकद आहे. कठीण प्रसंगातून मार्ग निघेलच हा विश्वास ते स्वतः ठेवतात आणि सहकाऱ्यांच्या मनातही निर्माण करतात. राजकारणात यश मिळवण्यापेक्षा ते टिकवण्यासाठी लागणारे सातत्य, अभ्यास, संयम आणि लोकांशी असलेले नाते देवेंद्रजींनी जतन केले आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास हा निव्वळ एका राजकीय नेत्याचा नसून महाराष्ट्राच्या विकासाच्या ध्यासाने प्रेरित असलेल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याचा प्रवास आहे. आज महाराष्ट्र देशात वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांमध्ये अग्रस्थानी आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी, तंत्रज्ञान, नागरी विकास, जलसंपदा अशा सर्व क्षेत्रांत पडत असलेल्या मोठ्या पावलांमागे देवेंद्रजींची दूरदृष्टी आणि विकासाभिमुख विचार आहेत. मोठी स्वप्ने पाहणे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी लागणारी चिकाटी बाळगणे हे त्यांच्या नेतृत्वाचे गमक आहे. एवढी मोठी पदे आणि स्थान मिळूनही त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेली नाळ तुटू दिली नाही. खेड्यातील कार्यकर्ता असो की शहरातील नागरिक, प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची तयारी हीच त्यांची खरी ताकद आहे. राजकारणातील यश-अपयश, कौतुक आणि टीका या सर्वांमध्ये शांत राहून नव्या उमेदीने कामाला लागण्याचा गुण देवेंद्रजींमध्ये स्पष्टपणे दिसतो. माझ्या दृष्टीने ते केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पक्षनेते नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा अहोरात्र विचार करणारे, अभ्यासू, कष्टाळू आणि दूरदृष्टी असलेले लोकनेते आहेत. त्यांच्या कार्यशैलीत आधुनिकतेचा विचार आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता यांचा उत्तम समतोल आढळतो. देवेंद्रजींचा हा प्रवास ध्येय, मेहनत, शिस्त आणि लोककल्याणाच्या बांधिलकीचा प्रवास आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये नवा अध्याय जोडणारे ठरो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत