► वृत्तसंस्था लंडन
अँडी बर्नहॅम यांनी सोमवारी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. ते गेल्या 10 वर्षांतील ब्रिटनचे सातवे पंतप्रधान ठरले आहेत. देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आपले सरकार प्रामुख्याने महागाई आणि निकृष्ट सार्वजनिक सेवा यांसारख्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. ब्रिटन सध्या मंद आर्थिक वाढ, अकार्यक्षम सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांच्या समस्या यांसारख्या अनेक आव्हानांशी झुंज देत असताना आता 56 वर्षीय बर्नहॅम यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत.
माजी पंतप्रधान कीर स्टारमर यांनी 10 डाउनिंग स्ट्रीटबाहेर निरोपाचे भाषण दिल्यानंतर राजा चार्ल्स यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. यानंतर, ग्रेटर मँचेस्टरचे माजी महापौर अँडी बर्नहॅम यांनी राजाची भेट घेत औपचारिकपणे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. सरकारचा ताबा घेण्याव्यतिरिक्त त्यांना आपले नवीन मंत्रिमंडळही स्थापन करायचे आहे.
पंतप्रधान बर्नहॅम यांच्यासमोर आव्हान
पंतप्रधान झाल्यानंतर बर्नहॅम यांच्यापुढील पहिले मोठे आव्हान त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करणे हे असेल. या नियुक्तीदरम्यान अर्थमंत्र्यांच्या नियुडीकडे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कारण पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्यातील मतभेदांमुळे यापूर्वी अनेक सरकारांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.
ऊर्जा सुरक्षा मंत्री एड मिलिबँड यांना पूर्वी या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु आता गृहमंत्री शबाना महमूद यांना आघाडीवर मानले जात आहे. शबाना या पाकिस्तानी वंशाच्या नेत्या आहेत. तथापि, बर्नहॅम यांनी मी अद्याप आपला मंत्रिमंडळाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसून अटकळांकडे लक्ष देऊ नये, असे स्पष्ट केले आहे.
